निलंगा: शेतीपंपाचे विजबील भरून देखील लाईनमनने केदारपूर येथील रोहित्रावरील विज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत. तसेच विज कनेक्शन का तोडले म्हणून विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच लाईनमन दमदाटी करत आहे.
निलंगा तालुक्यातील केदारपूर येथील शेतकरी गोविंद उर्फ उदयभान मचकुरे, व भरतसिंग ठाकूर, शेषराव खोत, काशीनाथ क्षिरसागर, मधूकर सुर्यवंशी, नागनाथ बोयणे, ज्ञानेश्वर पारेकर यांच्याकडे झरी येथील ३३ के.व्ही.महावितरण कडून विजपुरवठा असून केदारपूर येथील ठाकूर रोहित्राला जोडलेला आहे. महावितरणणे दिलेल्या बिलाप्रमाणे सर्वच शेतकऱ्याने विजबील भरली असून देखील संबंधित लाईनमन व शाखा अभियंता यांनी सदरील रोहित्रावरील विज कनेक्शन पूर्व सुचना न देता तोडला आहे. विज कनेक्शन का तोडले म्हणून संबंधित शेतकऱ्याने विचारणा केली असता दादागिरीच्या भाषेत दमदाटी करत शेळके नावाचा लाईनमन उध्दट भाषेत बोलत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

वरील सर्वच शेतकऱ्यांनी वेळेत महावितरणला बिले भरून देखील त्यांचे विज कनेक्शन तोडल्याने, मिरची, कांदे, ऊस, भूईमुग, ज्वारी हे पिके वाळत आहेत. तात्काळ हे कनेक्शन जोडले नाहीतर संबंधित लाईनमन व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
लॉकडाऊन काळातील सर्वच विजबील माफ करू म्हणणारे हे ठाकरे सरकार आता मात्र शेतकरी व्यापारी यांना जास्तीचे विजबिले देऊन त्यांची लुटमार करत आहे. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख तर याविषयी एक शब्दही बोलत नाहीत. लातूर जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी यांच्यावर महावितरण अन्याय करत आहे. तरी देखील पालकमंत्री मुग गिळून गप्प आहेत. महावितरणच्या संजीवणी योजनेतून सर्वच शेतकऱ्यांनी आपली विजबिले भरून बेबाकी घेतली आहे.तरी देखील आमच्यावर अन्याय हे महावितरण करत आहे अशी ओरड शेतकऱ्यांची आहे.