1 min read

मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो ईच्छा....

संदीप खरेची कविता सलीलने कव्वालीच्या रूपात मांडली आणि ती मनात घर करून बसली.
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो ईच्छा
वेळ पाहूणी खेळ मांडणे नामंजूर...
वेळ पाहून, मुहूर्त पाहून काम करणे स्वभावात नाहीच माझ्या. मुहूर्ताचा बागूलबुवा ईतका करून ठेवला आहे
की, बहुतेक वेळा मूहूर्ताच्या नादात चांगले काम करण्याची वेळ हातची निघून जाते. ज्या गोष्टी महूर्तावर केल्या
गेल्या त्या य़शस्वी होतातच असे नाही. आजकाल सोशल मिडीयावर पुरोगामी विचारांच्या लोकांकडून तर
मूहूर्ताची यथेच्छ धुलाई होत आहे. याच धुलाईत मुहूर्त सांगणारा पुरोहीत वर्ग देखील आपटून निघतो आहे.
त्यासोबत पौरोहित्य न करणारा वर्ग देखील भरडून जातो आहे. राजकारणाचा हा महिमा दुसरं काय!
असो, तो विषय या लेखनाचा नाही. तर मुहूर्त आणि वेळ या बाबत आपण विचार करणार आहोत. संदीपच्या
याच गाण्यात आणखी एक ओळ आहे ती देखील तपासली पाहिजे.
तुफान पाहून तिरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची, नंतर बोलू काही
मी याच ओळीजवळ थांबलो, आणि विचार करू लागलो. ज्या क्षणी ईच्छा होईल त्या क्षणी काम करण्याची
भावना खरी की, तुफान आल्यावर बोलण्याची झालेली ईच्छा थांबवत तुफान सरण्याची वाट बघणे खरे? योग्य
वेळ, योग्य संधी आणि अनुकूल स्थितीची वाट बघणे आवश्यक असते. जंगलात वाघ, सिंह आदी भयंकर
शक्तीशाली पशू शिकारीला निघतात तेव्हा सिनेमातील अंडरवल्ड अथवा डाकू प्रमाणे अंदाधूंद फिरत नाही की,
गर्जना अथवा डरकाळी मारत जंगल दणाणून सोडत नाहीत. चरण्याच्या ठिकाणी अथवा पाणवठ्यावर दबा
धरून बसतात. सावज टप्यात येण्याची वाट बघतात आणि त्यावेळी हालचालीवर नियंत्रण ठेवत आपली चाहूल
लागणारच नाही यांची काळजी घेतात. एक झेप घेतली सावज तावडीत येईल, याची खात्री पटली आणि योग्य
वेळ साधली की, मग झेप घेऊन आपल्या सावजाला टिपतात. वाघ अथवा सिंह मुहूर्त पाहून नव्हे तर योग्य वेळ
गाठून आपल्या उदरभरणाचे साधन शोधतात. ही योग्य वेळ साधली नाही तर शिकार हातची जाण्याचा धोका
असतो.
उधानलेल्या,सागरात होडी घालून मासेमारी करणे धोकादायक असते. वाट पहावी लागते, दर्या शांत होईपर्यंत.
उफानलेल्या सागराला शांत होईपर्यंत वाट न बघता होडी घातली तर मासे मिळणे दूर, जीव धोक्यात जाऊ
शकतो. त्यासाठी योग्य वेळेची वाट बघितली पाहिजेच. ही वाट बघणे व्यक्तीगत क्षमतेप्रमाणे आहे. सिंचनाच्या
सोयी नव्हत्या तेंव्हा विशिष्ट मोसमात विशिष्ट पिके घेतली जात. पेरणी वैशाख वनव्यात केली तर बियाणे
जळून जाण्याची शक्यताच अधीक असते त्यासाठी मृगाची वाट बघावी लागते. पण ज्याच्याकडे पाणी आहे तो
कधीही पेरणी करतो. उन्हाळी भुईमुग, बारमाही अंबा अशी पिके झालीच की.

लग्नाचे मुहूर्त दिवाळी झाली किंवा उन्हाळ्यातच का? मला वाटत यात धर्माशास्त्र या पेक्षा अर्थशास्त्र महत्वाचे
होते. दिवाळीच्या आधी सुगी होऊन जाते आणि उन्हाळ्याच्या सुरूवातील सगळी खळे होऊन जातात. शेतकरी
वर्गाचे घर त्यावेळी धान्याने भरलेले असते. शेतीची फारशी कामे शिल्लक नसतात. अशा वेळी मंगल कार्य
घरात होणे सोयीचे असते. म्हणून धान्य निघाल्यावर लग्न कार्य असा प्रघात पडला. अर्थात लग्नायोग्य वय
होईपर्यंत वाट बघण्याची गरज येथेही उरतेच. अर्थात शेतीसोबत व्यापार आणि नौकरी हे क्षेत्र वाढल्याने येथेही
वेगवेगळ्या मोसमात लग्न होऊ लागली आहेतच. ईथेही क्षमता आणि वेळ याचा विषय येतो. शेतीच्या
उत्पन्नावर अवलंबून नसणारा वर्ग आपल्या सोयीप्रमाणे लग्नादी सोहळे करतोच आहे. मला वाटतं त्यांची सोय
हा त्यांचा मुहूर्त.
खरतर मुहूर्त ही संकल्पना योग्य वेळ आणि सोय याच्याशी निगडीत असावी. एखाद्या गोष्टीत जाणकार
लोकांचा सल्ला घेणे अथवा समाजाच्या सोयीने एखादी गोष्ट करणे ही त्या काळातील पध्दतच होती. आपल्या
शुभकार्यात किंबहूना आनंदात लोक यावेत असं सगळ्यानांच वाटतं. लोक यायची असतील तर त्यांच्या
सोयीची वेळ हवी. आता नाही का आपण शनिवार रविवारचा मूहूर्त पाहतो. तसच कांहीसं जेव्हा आप्त-
स्वकियांना सोयीचे होईल तेंव्हा कार्य आयोजित करायचे. म्हणजे आनंद वाढतो हीच ती संकल्पना. प्रचंड
थंडी अथवा पाऊस असताना लग्न करणे म्हणजे आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करताना तारांबळ उडण्याची
शक्यता असते. त्यामुळे लग्नाच्या तारखा त्या काळात नव्हत्या आता अवाढव्य मंगल कार्यालय आली आणि
कोणत्याही मोसमात लग्न धडाक्यात होऊ लागलं.
प्रत्येक व्यवसायाचा एक सिझन असतो. त्या सिझनच्या आधी कांही दिवस व्यवसाय सुरू झाला तर भांडवल
अडकून पडण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे व्यवसाय सिझनच्या आधी सुरू करणे आणि सिझन संपला
असेल तर परत सुरू होण्याची वाट बघणे आवश्यक ठरते. अन्यथा भांडवल अडकून पडून नुकसान होण्याचा
धोका अधीक असतो.
सगळ्या गोष्टीसाठी व्यवहार चतूर माणसांचा सल्ला घ्यावा लागतो जो लाभदायकच ठरतो. हे चातुर्य अनुभवी
व्यक्तीकडे असते.( यात जातीचा संबंध येत नाही) त्यामुळे ईच्छेसोबत योग्य वेळ गाठणे देखील आवश्यक
असते. ती चंद्र, तारे, गृह यावर बघण्याशिवाय आधी पर्याय नव्हता कारण कॅलेंडर आणि महिणे त्याकाळी
नव्हते की, घड्याळ नव्हती. त्यामुळे सुर्य चंद्र यांची स्थिती यावरून वेळ. आकाशात नक्षत्रांच्या दिसण्यावरून
मोसमांचा अंदाज, लावला जायचा. आता कालगणना सोपी झाली आहे. त्यानुसार योग्य वेळा ठरवाव्यात
एवढंच बाकी शुभ अशुभ ही कालबाह्य संकलप्ना एवढेच. पंचांग नको पण कलेंडर तरी बघावेच लागतेच की.
त्यावेळी पंचांग बघत होते. आणि ते ज्यांना समजत होते त्यांना विचारले जात होते. आज हवामान खाते
आहेच की. आणि हो खगोल शाश्त्र देखील आहेच.