मुंडे-गडकरी व्यक्तिमत्त्वाचे आकलन

मुंडे-गडकरी व्यक्तिमत्त्वाचे आकलन

मुंडे-गडकरी या दोन नेत्यांमधील कथित मतभेदांची व गोपीनाथ मुंडे यांच्या पश्‍चात त्यांच्या
गटाचे गडकरी गटाशी स्नेहमिलन याची चर्चा करण्यापूर्वी या दोन नेत्यांची जडणघडण समजून
घेणे आवश्यक आहे. त्यासोबत छोट्या छोट्या घटनांमधून त्या दोघांमधील संबंध कसे होते हेही
तपासणे आवश्यक आहे. 
गोपीनाथ मुंडे सामान्य, गरीब शेतकरी कुटुंबातील. गावही परळी तालुक्यातील नाथरा हे छोट गाव.
मुंडेंना संघर्षाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांचे आयुष्य एक संघर्षयात्राच होती. प्रस्थापित
राजकारण्यांविरोधात लढत स्वत:ची राजकीय प्रतिष्ठा निर्माण करणे सोपी गोष्ट नव्हती. प्रमोद
महाजनांची सोबत मिळाली. आणीबाणीच्या आंदोलनात सहभागी झाले आणि गोपीनाथ मुंडेंच्या
गाडीने राजकीय वेग घेतला. राज्याच्या राजकारणाला चार-दोन लोकांच्या केंद्रस्थानातून काढून तिथे
गोपीनाथ मुंडे पोहचले होते. एखाद्या माणसाला शब्द द्यावा, तो पूर्ण करण्यासाठी जिवापाड
प्रयत्नकरावा, त्यासाठी प्रसंगी पक्षात आपली बाजू भक्कम व आक्रमकपणे मांडावी, यात
गोपीनाथराव तरबेज होते. एखादा शब्द पाळणे झाले नाही तर त्या कार्यकर्त्याच्या घरी जातील.
तिथे जेवण करतील. चारचौघांत त्याला घेऊन फिरतील. त्या कार्यकर्त्याची प्रतिष्ठा वाढविण्यसाठी
वाटेल ते हातखंडे करण्याची गोपीनाथ मुंडेंची तयारी होती. प्रचंड गुणवत्ता असूनही पात्रतेप्रमाणे
मोठेपण गोपीनाथरावांना मिळाले नाही. आणि जेंव्हा ते मिळण्याची वेळ आली तेंव्हा काळाने
त्यांना हिरावून नेले. केंद्रातील प्रमोद महाजन हा मुंडेंचा आधार. महाजनांचे राजकारण लोकांशी
संबंधित नव्हते. पक्षाचे सिद्धांत, धोरणे यावर महाजनांचे विशेष काम चालत असे. त्यामुळे
मुंडेंसाठी महाराष्ट्रातील लढाई एकहाती होती. 
ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या पक्षाला सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायची जबाबदारी मुंडेंवर होती.
म्हणून ते आक्रमक बनत गेले. शब्द देण्याच्या बाबतीत त्यांचे धोरण जरा लवचिकच राहिले.
त्यांचे कार्यकर्ते गंमतीत म्हणायचे, साहेबांना ताजमहाल मागितला, तरी ते देऊन टाकतो म्हणतील.
मुंडे होतेही तसेच. ‘नाही’ हा शब्दच ते वापरत नसत. कदाचित लोकांत जाण्यासाठी त्यांना हे
करावे लागायचे. 
याच्या उलटस्थिती नितीन गडकरी यांची होती. मुंडे छोट्याशा वाडीवरचे तर गडकरी वाड्यावरचे
होते. संघाच्या जन्मभूमीत गडकरींचा जन्म झाला. मुंडेंच्या जन्मभूमीला संघर्षाचा स्पर्श होता.
गडकरींचे घर उच्चशिक्षित होते. मुंडेंचे घर एका कष्टकर्‍याचे. जन्मापासूनच संघाच्या वरिष्ठ
पदाधिकार्‍यांसोबत गडकरींचा वावर होता. त्यामुळे तसा संघर्ष गडकरींच्या वाट्याला आला नाही.

नागपूर शहरी भाग संघ प्रभावातील. एका सॉफिस्टीकेटेड कल्चरमध्ये गडकरी वावरत होते. त्यामुळे
पूर्ण होणारा शब्द द्यावा. नसेल जमत तर स्पष्ट नाही म्हणून सांगावे. हा गडकरींचा स्वभाव
होता. मुंडेंचे कार्यकर्ते जशी मुंडेंकडे मागणी करायचे तशी मागणी गडकरींच्या कार्यकर्त्यांनी केली
तर ते चिडणारच. मुंडे व गडकरींमध्ये गडकरी तसे नशिबवान. मुंडेंच्या संघर्षापेक्षा गडकरींचा संघर्ष
कमी असूनही संघाच्या परिसस्पर्शाने गडकरींचे सोने झाले. राज्यात मंत्री, प्रदेशाचा अध्यक्ष ते थेट
राष्ट्रीय अध्यक्ष, त्यानंतर केंद्रात प्रभावी मंत्री अशी गडकरींची चढती भाजणी राहिली. तुलनेत
उपमुख्यमंत्री पद गेल्यापासून आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी मुंडेंना संघर्षच करावा लागला. 
यात दोन नेत्यांमधील हा फरक. मुंडेंचा संघर्ष, मुंडेंचा सर्मथक कार्यकर्ता बघत होता. गडकरींचे
राजऐश्‍वर्य वाढते होते. मुंडे त्यासाठी धडपडताना दिसत होते. अर्थात लोकनेता म्हणून गोपीनाथ
मुंडेंची ताकद मोठी होती. म्हणून मुंडे समर्थक कार्यकर्ता अस्वस्थ होता. साहेबांच्या मार्गातील
मोठी अडचण म्हणजे गडकरी ही भावना अधिक गडद होत होती. लोकलेखा समितीचे अध्यक्षपद
गेल्यानंतर तर कार्यकर्ता अधिकच अस्वस्थ झाला. तो गडकरींकडे ‘व्हिलन’ या नजरेने पाहू
लागला. मुंडेंच्या मृत्यूची घोषणा गडकरींनी केल्याने ही भावना अधिक तीव्र झाली. गडकरी म्हणजे
शत्रू हा समज मनात होता. त्याला ज्यांचा फायदा होईल अशा विरोधी गटाने हवा द्यायला
सुरुवात केली. दोन गट विभक्त झाले की, तिसर्‍या गटाचा उदय नक्कीच. म्हणून स्वत:चा
फायदा पाहणार्‍या खुशमस्कर्‍यांनी याचा लाभ घेतला.
पण वस्तुस्थिती वेगळीच होती. जी चारचौघांत दिसत नव्हती. १९९५ साली युती सरकार असताना
मुंडे उपमुख्यमंत्री होते तर गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री. बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या
विकासासाठीचा प्रस्ताव घेऊन गडकरी मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर गेले. जाताना आपल्या
खात्याच्या कार्यकारी अभियंत्यालाही घेऊन गेले. त्याचे नाव होते देवधर. कार्यकारी अभियंत्याला
दालनाच्या बाहेर मुंडे साहेबांचा वेळ अमूल्य असतो, नाहक वेळ घालवू नका. त्यांच्या सूचना ऐका
व त्याची अंमलबजावणी करा, असे वारंवार सांगत होते. आत जाताना परवानगी घेऊनच गेले.
दुसरी घटनाही तशीच. गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांचे विधान मुंडेंविषयी आदराची
भावना स्पष्ट करणारे होते. मी राष्ट्रीय अध्यक्ष असलो व मुंडे उपाध्यक्ष असले तरी ते आमचे नेते
आहेत, हे सांगायला गडकरी विसरले नाहीत. मुंडेंचे मोठेपण, त्यांची ताकद गडकरींना ठाऊकच होती.
पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या दोघांमध्ये काही मुद्यांवर मतभेदही होते. पण हे मतभेद
गडकरी-मुंडे यापेक्षा गडकरी-महाजन असे होते. कारण गडकरींचा विरोध सिद्धांताला होता. पक्षाच्या
संचलनातील प्रमेयाला होता. मुंडे लोकनेता होते. वादळासारखा पक्ष चालवायचे, लोकांना घेऊन
वावरायचे. सत्ता, पक्ष हे लोकांसाठी असते. त्यांना अनुकूल असेच पक्षात असायला हवे, असे मुंडेंना
वाटायचे. यातूनच मतभेद होत गेले. अर्थात या मतभेदाला व्यक्तिगत वादाची किनार नव्हती. पुढे
पुढे संधीसाधू मंडळींनी आपल्या भल्यासाठी याला व्यक्तिगत वादाचे स्वरुप दिले. कोणी कान भरत

गेले तर कोणी कान फुंकत गेले. वाद वाढविणारे लोक आपापला फायदा वाढवत गेली. नेमकी हीच
गोष्ट ओळखण्याची गरज आहे. दोघांचाही सन्मान तेवढाच. म्हणून भविष्यातील राजकारण अधिक
बळकट होण्यासाठी एकत्र यायला हवे.
भाजपत मनोमिलनाची गरज
वाघाची तब्यत बिघडली किंवा वचक संपला की त्याच्या अंगावर उंदरे देखील उड्या मारू लागतात.
अशी कांही स्थिती भाजपमधील नेत्यांची झाली आहे. ज्यांना जनसमर्थन आहे. दृष्टी आणि
दृष्टीकोण आहे अशी नेते मंडळी वाद आणि प्रवादामध्ये अडकून पडली आहेत. त्यामुळे अनेक
सुमार दर्जाच्या नेत्याचे फावते आहे. आणि भाजपत आज जो छुपा असंतोष दिसतो आहे. ते
त्याचेच कारण आहे.
अनेक वर्षापासूनचे गैर समज आणि शंका कुशंका यात भाजपमधील अनेक मोठे क्षमता असलेले
नेते आज आपल्या राजकीय करीयर साठी झगडताना दिसत आहेत. आपल्या समर्थाकांचे अपेक्षा
पूर्ण करताना अथवा आपल्या भागाच्या विकासाच्या मागण्या पूर्ण करताना मोठा संघर्ष करावा
लागत आहे.
भाजप मधील परंपरागत संघर्ष माणला गेला आणि दिसला तो म्हणजे गोपिनाथ मुंडे आणि नितीन
गडकरी यांच्यामधील संघर्ष हा संघर्ष तळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचला आणि ही दोन गट
एकमेकासमोर दुष्मनासारखी उभी राहिली. स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर तर
या संघर्षाने अधीक तिव्र स्वरूप धारण केले. आणि मनावर वार होऊ लागले.
गडकरी आणि मुंडे यांच्यातील वाद असे व्यक्तीगत पातळीवरचे कधीच नव्हते ते सिध्दांत आणि
पक्ष चालविण्याच्या पध्दतीबाबत मतभेद होते मनभेद या प्रकारात ते कधीच आले नाहीत. अगदी
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या स्थापनेचे वेळेला देखील हे स्पष्टपणे समोर आले. मुंडे राज्यात नेते आहेतच
ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहतीलच शिवाय विधानसभा निवडणुका पर्यंत ते केंद्रीय मंत्रीमंडळात
महत्वाच्या पदावर असावेत या मताचे गडकरी देखील होते. त्या आधी मुंडे गडकरी यांच्यात अनेक
भेटी झाल्याचे चर्चा झाल्याचे देखील सर्वाना ठाऊक आहे. मुंडे ही राजकीय ताकद काय आहे.
आणि राज्यात ती काय  महत्व ठेऊन आहे याची जाणिव गडकरी ना होती. आणि गडकरी यांच्या
क्षमतेचा अंदाज गोपिनाथ मुंडे यांना देखील होता.
मुंडे गडकरीना पक्षाध्यक्ष झाल्यावर देखील हक्काने नितीन अशा एकेरी नावाने हाक मारायचे आणि
गडकरी देखील ती हाक सहजपणे घेत मुंडेच्या मोठेपणाचा सन्मान करायचेच.

वाद होता तो कामाच्या पध्दतीमध्ये. गोपिनाथ मुंडे यांच्या मताप्रमाणे एकदा पक्षाची जबाबदारी
आणि निवडणुकीतील विजयाची जबाबदारी एका माणसाच्या खांद्यावर दिली की सर्व संघटनात्मक
निर्णय त्याच व्यक्तीनी घेतले पाहिजेत. निवड नियुक्ती यात कोणी ढवळाढवळ केलेली मुंडे ना
आवडत नसे.  आणि एक लोकनेता म्हणून त्यांची ही भुमिका नैसर्गीक अशा स्वरूपाची देखील
होती. खुप लोकशाही कधी कधी पक्षाच्या विकासास मारक देखील ठरत असते आणि निर्णयास
विलंब लागू शकतो. गडकरी याच बाबत जरा वेगळे मत ठेऊन होते. निर्णयात अनेकांचा सहभाग
असावा अशी त्यांची धारणा होती. आणि अल्पसंख्याक समाजातून आल्याने गडकरींची अशी
भुमिका असणे स्वाभाविक होते. या एकाच मुद्यावर वाद होत गेले आणि ते वाढत गेले. किंबहुना
कांही स्वार्थी अनुयायानी आपले आपल्या नेत्याजवळचे महत्व कायम रहावे यासाठी या वादाला
वाढवले देखील.
हयातीत गोपिनाथ मुंडे आपल्या पक्षात दोन वेळा आक्रमक झाले आणि योगायोगाने गडकरी
त्यावेळेला अध्यक्ष होते. आताचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपले होर्डीग भाडोत्री एजन्सी
मार्फत राज्यभर लावले होते. बीड जिल्हयात देखील फक्त तावडे यांच्या फोटोसह होर्डीग लागले
होते. तावडे स्वतःला राज्याचा नेता म्हणून प्रोजेक्ट करू पाहत होते. आणि मुंबई प्रदेशाध्य़क्षाची
निवड जेंव्हा पक्षाने केली तेंव्हा आपल्या मताचे महत्व पक्षात घेतले जात नाही हिच भावना मुंडे
यांना अस्वस्थ करणारी होती. आणि ते आक्रमक होताच पक्षाला देखील त्यांचे महत्व समजले
कांही दुरूस्ती करण्यात आल्या. खर त्याच वेळी कांही  स्वार्थी मंडळीनी मुंडे यांचे पक्षातील महत्व
कमी होणार अशा अफवा पसरायला सुरूवात केली होती. पण मुंडे या सर्वाना पुरून उरले. दोन
वेळा बीड लोकसभा मतदार संघातून विजयी झाले.
दोन्ही नेते आपापल्या परीने सक्षम आणि सशक्त नेते आहेत. मुंडे यांच्या पश्चात देखील ती
ताकद आज दिसते आहे. ही दोन गट शक्तीने कमी झाली तर आपले फावते हे ठाऊक असलेल्या
नेत्यांनी या गटातील वितुष्ट वाढवायला सुरूवात केली. आणि अपेक्षेप्रमाणे तसे घडले देखील. मुंडे
गडकरी गटाचे प्राबल्य राहिले असते तर आश्चर्य वाटेल अशी नावे पक्षात अथवा सरकारी
पातळीवर कधीच मोठी झालेली दिसली नसती. आठवले केव्हाच मंत्री झाले असते. आणि
सामाजिक न्याय सारखे खाते पक्षाला लाभ होईल अशा सर्वपरिचित चेह-याकडे राहिले असते.
आज भाजपत जी माणसे मोठी झाली आहेत अथवा महत्वाच्या पदावर आहेत ती खरच त्या
क्षमतेची आहेत का याची तपासणी होणे गरजेचे आहे. ती या महत्वाच्या पदावर पोहचली याचे
कारणच दोन गटातील मनभेदामुळे हे घडत आहे. दोघांच्या भांडणात तिस-याचा लाभ होत आहे.

मतभेद काय? वाद नेमके कोणत्या विषयावर?खरच मनभेद आहेत का ? या प्रश्नाची राजकीय आणि
खासगी स्वरूपातील उत्तरे देखील कांहीच नाही अशी येतील पण वाद आहेत याची चर्चा झाली ती
वाढत गेली आणि वाद असल्याचे शिक्कामोर्तब झाले असंच कांहीस हे घडत आलं आहे.
गडकरी आणि मुंडे ही दोन्ही नेते कमालीची परीपक्व आहेत. पंकजा मुंडे देखील तोच वारसा घेऊन
पुढे जात आहेत. मुंडेचा वारसा आणि अंगभुत कोशल्य असलेल्या पंकजा राज्याच्या राजकारणात
प्रभावी ठरू शकतात. आणि दोन प्रभावी गट एकदिलाने काम करू लागले तर आपली दाळ
शिजणार नाही हे लक्षात आलेल्या लोकांनीच या वादाला खतपाणी घातले.
खरतर मुंडे भक्त असलेल्या सर्वच  कार्यकर्त्याच्या भावना खूप आतून आहेत.  पण राजकारण
भावनेपेक्षा प्रत्यक्षावर चालते. डावपेचावर चालते. याला माघार तडजोड असे न समजता राजकीय
डावपेच म्हणून स्विकारले तर राज्याच्या राजकारणाला नवी दिशा आणि हवे असलेले नेते
मिळतील लोकनेते राज्याचे नेते बनतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

एकत्रीकरणाचा हुंकार

राजकारणात काहीच कायम नसतं. मरणानंतर वैर संपते. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात या
दोन्ही वाक्यांना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. एकत्रीकरणाचा प्रयोग, भावना अथवा लाट
यावर न घेता प्रत्यक्षातील गरज यावर घ्यायला हवा. मुंडे, गडकरी गटाच्या एकत्रीकरणासाठी
चर्चेला सुरुवात झाली असून प्राथमिकस्तरावर या संबंधीची चर्चा सुरू झाली आहे. याला लवकरच
मूर्तरूप येणार आहे. फक्त या प्रयत्नांना दोन्ही गटांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज
आहे. 
भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा वाटा राहिला आहे, ती सगळी मंडळी आज
वादात अडकली किंवा दुर्लक्षित अवस्थेत आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांचे सर्मथक
सैरभैर अवस्थेत आहेत. स्वाभाविक गुणधर्मानुसार ती भाजपवर चिडतही आहेत. याचा फायदा
भाजपतील आणि बाहेरील मंडळी घेत आहेत. मुंडे गटाच्या संतप्त भावना पक्षश्रेष्ठींसमोर बंडाची
भाषा म्हणून कौशल्याने मांडण्याचा उद्योग पक्षातीलच काही मंडळी करत आहेत. याचा फटका
सर्मथक नेत्यांना बसावा हीच त्यामागील भूमिका आहे. विरोधी पक्षाकडून ही संतापाची भावना
अधिक तीव्र कशी होईल याची काळजी घेतली जात आहे. समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया
व्यक्त करणारा विशिष्ट वर्ग विरोधी पक्षाकडून नियुक्त केला गेला आहे.

समाजाच्या भावना भाजपविरोधी आहेत, अशा स्वरुपाचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात आहे.
याचे दोन परिणाम घडण्याची शक्यता आहे. एक समाजात व सर्मथकांत भाजपविरोधी लाट प्रबळ
होईल. त्याचा फायदा आपसूक विरोधी पक्षाला घेता येईल. भाजपत या कार्यकर्त्यांविषयी वाईट मत
तयार होईल. त्याचा फटका नेतृत्वाला बसेल. अर्थात नेतृत्वासोबत पक्षाचं मोठं नुकसान होणार
यात शंका नाही. गडकरी व मुंडे गटाच्या भाजप कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली तर ते
पुढील राजकीय वाटचालीसाठी अधिक हितावह ठरणार आहे. 
बेरजेचं आणि वजाबाकीचं राजकारण हा शब्द नेहमीच वापरला जातो. माणसं जोडत जाण्याला
बेरजेचं राजकारण म्हणतात तर तोडत पुढं जाण्याला वजाबाकीचं राजकारण म्हणतात. मागच्या
काही काळात शोलेमधील असरानी चांगलाच गाजला. तसं काहीसं पक्षात होणार नाही याची
काळजी घेतली पाहिजे. 'हम अंग्रेज के जमाने का जेलर है। आधे इधर जाव, आधे उधर जाव' असेच
म्हणत 'बाकी मेरे पिछे आवो' म्हणताना आपल्या मागे कोणी उरत नाही हे त्याच्या लक्षातच येत
नाही म्हणून इंग्रजांच्या काळातील जेलर बदलून आता आधुनिक काळातील जेलर आणायला हवा.
बेरजेचं राजकारण करत काही माणसं जोडताना काही माणसं दूर जातील. पण सोयीची माणसं
जवळ आणता येतात हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्लासात पाणी भरताना अनावश्यक हवा बाहेर
पडते. पण ग्लासात पाणी भरले असेच म्हटले जाते. ग्लासातून हवा बाहेर काढली असे कोणी
म्हणत नाही. तसं बेरजेच राजकारण करताना आवश्यक माणसं जोडल्या जाणं आवश्यक असतं.
या आवश्यक माणसांची आवश्यकता काळ ठरवतो. भूतकाळातील भावना नव्हे. त्यामुळेच या
दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 
या सगळय़ांमध्ये अडचण आहे ती लोकभावनेची. म्हणूनच दोन्ही बाजूच्या समर्थकांनीदेखील नेता
आणि पक्षाच्या भल्याचा विचार करून निर्माण करून दिलेल्या भावनांमध्ये बदल करण्याची गरज
आहे. हा बदल घडला नाही तर संघर्षासाठी बळाचा नाहक वापर होणार आहे. या सगळय़ात
महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकाचा संघर्ष व्हावा, असे कोणतेही मतभेदाचे मुद्दे अथवा कार्यक्षेत्रातील
समान व्यक्ती दोन्ही गटात नाही. परस्परातील समन्वयाने हे सहज होऊ शकते. सुरुवात कशी
करायची हाच खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर एका हिंदी शेरातून मिळेलच.
मैंने जिंदगी की उलझनो को कुछ.
इसतरह आसान कर दिया
किसेसे माफी मांगली,
किसको माफ कर दिया.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.