पद्वीधर नंतर पालिका निवडणूक..?

1 min read

पद्वीधर नंतर पालिका निवडणूक..?

औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना सहा महिन्याची मुदत संपल्यामुळे राज्य शासनाने आणखी तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यानुसार, ते महापालिका प्रशासकपदावर ३१ जानेवारीपर्यंत कार्यरत राहतील. त्यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पालिकेची निवडणूक होऊ शकते.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार होती. परंतु, करोना संसर्गामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निवडणूक पुढे ढकलल्यामुळे पालिका आयुक्तांना प्रशासकपदी नेमण्यात आले. पालिकेवर प्रशासक नेमण्याच्या संदर्भात शासनाने नियम केले आहेत. या नियमानुसार केवळ सहा महिन्यांसाठी पालिकेवर प्रशासक नेमता येतो. औरंगाबाद महापालिकेच्या बाबतीत सहा महिन्यांची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपली. परंतु, करोना संसर्गची स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने महापालिकेवरील प्रशासकीय राजवट तीन महिन्यांनी वाढवली. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत पालिकेवर आस्तिककुमार पांडेय प्रशासक म्हणून कायम राहणार आहेत. प्रशासकपदाला शासनाने केवळ तीन महिने मुदतवाढ दिल्यामुळे जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, असे मानले जात आहे. प्रशासकीय राजवटीला मुदतवाढ देताना शासन सहा महिन्यांची मुदतवाढ देऊ शकले असते, पण असे न करता केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मुदत संपता संपता महापालिकेची निवडणूक होईल, असे मानले जात आहे.