विजय कुलकर्णी/परभणीः विम्याचे पैसे लुटण्यासाठी एका व्यक्तीचा खून करत, तो रस्त्यावरील अपघात दाखविणाऱ्या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या तीन साथीदारांना ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले आहे. बडतर्फ पोलिस कर्मचारी संतोष अंजीराम जाधव याने विम्याचे पैसे लुटण्यासाठी दोन खून केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
मानवत रस्त्यावर परभणीपासून १५ किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रकाश गायकवाड (रा. संबर) मृत्यू पावल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबर २०१९ रोजी दाखल झाली होती. त्यासंदर्भात फौजदार गिते हे तपास करत होते. या तपासा दरम्यान अनेक धक्कादायक बाबी निष्पन्न झाल्या होत्या. विशेषतः मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नावावर विमा असल्याचे कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्यानंतर, त्यात बडतर्फ पोलिस कर्मचारी अशोक अंजीराम जाधव हाच वारसदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेषतः संतोष जाधव हा मयत व्यक्तीच्या मोबाईलवर सातत्याने संपर्कात होता,हेही तपासातून स्पष्ट झाले.जाधव याने यापूर्वी नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा घडवून आणल्याची बाब नुकतीच समोर आली होती.त्या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि.गणेश राहिरे,गिते यांनी जाधव याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबधित तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काकडे यांच्याकडे देण्यात आला होता.जाधव यांची पोलिस कोठडी दरम्यान विचारपूस केली असता. त्याने त्या व्यक्तीच्या विम्याचा लाभ मिळण्याकरिता साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली. इतर साथीदार सेलू येथील आहेत.सेलूतच खून करीत पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता तो रस्ते अपघात असल्याचा बनाव केला होता. मृतदेह चारचाकी वाहनाने ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणून टाकल्याचीही कबुली दिली.
स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग व ग्रामीण पोलिस यांनी या कबुली जबाबाच्या आधारे पुणे,अहमदनगर आदी ठिकाणी आरोपींचा शोध घेतला.परंतु आरोपीने खोटी नावे सांगून दिशाभुल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवताच इतर आरोपीही सेलू येथीलच असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे सेलू पोलिसांच्या मदतीने रहिमोद्दीन(बुबा) मैनोद्दीन शेख (रा.विद्यानगर सेलू),अभय अशोक महाजन (रा.विद्यानगर,सेलू),उमेश अर्जुन तोडे (रा.अर्जुन नगर, सेलू)या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले.त्यापैकी रहिमोद्दीन व अभय महाजन हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणात प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काकडे हे तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.प्रदीप काकडे,पोनि.गणेश राहिरे, स्थागुशाचे सपोनि.व्यंकटेश आलेवार,विजय रामोड, फौजदार. साईनाथ पुयड,हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे,चव्हाण,शेख अजहर, हरिचंद्र खुपसे, शेख मोबीन, संतोष सानप, निळे, संजय घुगे, सोनवणे तसेच पुरनवाड, वासलवार, बारहाते, बालाजी रेड्डी आदींनी तपास केला.