नाथाभाऊच्या जाण्याने पक्ष थांबणार नाही - रावसाहेब दानवे

1 min read

नाथाभाऊच्या जाण्याने पक्ष थांबणार नाही - रावसाहेब दानवे

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचे काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही.

मुंबई: एकनाथ खडसे यांच्या जाण्यानेही महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचे काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही. त्याचप्रमाणे खडसे यांच्या जाण्यानेही थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपला एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वाची उणीव जाणवणार नाही. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. नेता हा अशा कार्यकर्त्यांमुळेच मोठा होतो. असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

चार दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा केला. जळगावात आमच्याकडे रक्षा खडसे, सुरशे भोळे आणि गिरीश महाजन यांच्यासारखे नेते आहेत. नाशिक व नगरमध्येही आमच्याकडे सक्षम नेतृत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता वाटत नाही. आम्हाला चिंता आहे ती नाथाभाऊंनी पक्ष सोडल्याची, मात्र आता त्यांनी निर्णय घेतल्याने हा विषय संपल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.