राष्ट्रवादीची दादागिरी,  शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा?

1 min read

राष्ट्रवादीची दादागिरी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा?

मी खासदार असताना देखील जर आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर माझ्या खासदारकीचा काहीही उपयोग नाही-खासदार संजय जाधव राष्ट्रवादीच्या दादागिरीवरुद्ध खासदारांचा एल्गार...

सिद्धेश्वर गिरी /परभणी :- शहरापासून ते राजधानीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोनोपॉलीविरुद्ध शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी एल्गार पुकारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पातळीवर गळचेपी होत असल्याने आणि विशेषतः जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अस्थायी प्रशासक नेमताना राष्ट्रवादीचा एकही आमदार नसून देखील सलग दुसऱ्यांदा त्यांच्या पक्षाला संधी दिली गेल्याने, "मी खासदार असताना देखील जर आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर माझ्या खासदारकीचा काहीही उपयोग नाही आणि मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेनेचे काम यापुढेही कार्यकर्ता म्हणून करत राहील असे त्यांनी  पत्रात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी खासदार जाधव यांनी एक लेखी पत्र पाठवून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी पदोपदी सुरू केलेल्या हस्तक्षेपासह दादागिरी विरुद्ध तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या त्या पत्रातून जिल्ह्यासह राज्यातील काही धोरणात्मक निर्णयातील एकतर्फी हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या या एकतर्फी निर्णयप्रक्रियेविरुद्ध श्रेष्ठींनी तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी असेही म्हंटले आहे. या पत्रात आपण अन्य बाबींचा सुद्धा उल्लेख केला आहे. सत्तेत असतानासुद्धा राष्ट्रवादीची  एकतर्फी भूमिका,निर्णय पूर्णतः चुकीचे असल्यासाचे म्हटले आहे.श्रेष्ठींनी आपल्या पत्राची गांभीर्याने दखल घ्यावी असाही  इशारा या पत्राद्वारे आपण दिला असल्याचे ते म्हणाले. काही माध्यमांनी आपण राजीनामा दिल्याच्या बातम्या दिल्या आहेत,त्याबाबत जाधव यांनी कोणताही खुलासा केला नाही, श्रेष्ठींनी आपण पत्राद्वारे तीव्र नाराजी दर्शवून दिल्याचे म्हटले आहे.