अनुदान वाटपात निलंगा तहसील अव्वल ,40 हजार शेतकऱ्यांना लाभ.

1 min read

अनुदान वाटपात निलंगा तहसील अव्वल ,40 हजार शेतकऱ्यांना लाभ.

80 पेक्षा जास्त गावात 40 हजार आठशे शेतकऱ्यांना 26 कोटी 12 लाखांचा निधी वर्ग तहसिलदार गणेश जाधव यांची लक्षणीय कामगिरी.

**** विजय देशमुख/निलंगा ****: अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात जिल्ह्यात सर्वात अगोदर तालूक्यात वाटप करून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम टाकण्यात निलंगा तहसिल ने आघाडी घेतली आहे. तहसिलदार गणेश जाधव व त्यांच्या टिमने जलदगतीने काम करत दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील 80 पेक्षा जास्त गावात 40 हजार आठशे शेतकऱ्यांना 20 कोटी 12 लाखांचा अनुदान निधी खात्यावर वर्ग केल्याने शेतक-यांची दिवाळी गोड होणार आहे .निलंगा तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच 800 हेक्टर जमीन खरडून गेली होती. काही घरांची अंशतः पडझड झाली होती. त्यामुळे शासनाने जिरायत व बागायत पिक नुकसानी करिता 10,000 रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक फळपिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्‍टर प्रमाणे नुकसान भरपाई जाहीर केली होती .
तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी 37,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आली होती.तर अंशतः घर पडझडी साठी 6000 रू नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली. त्यानुसार शासनाने 50 % निधी दि.10.11.2020 रोजी तहसील कार्यालयात वर्ग केला होता. त्यामुळे तात्काळ निलंगा तहसीलने दिनांक 12.11.2020 रोजी 30 गावातील 13,372 शेतकऱ्यांच्या खात्यात 7.84 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून अनेक गावातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष हातात पैसे पडले .
दिनांक 13.11.2020 रोजी पीक नुकसानीचे 53 गावातील 25,158 शेतकऱ्यांना 15.22 कोटी रु बँकेत वर्ग करण्यात आले.तसेच खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई म्हणून 37 गावातील 2201 शेतकऱ्यांना 3.01 कोटी रु.बँकेत वर्ग करण्यात आले .घर पडझड झालेल्या 82 कुटुंबांना 4.92 लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
तालुक्याला दि. 10.11.2020 रोजी प्राप्त झालेले 26.44 कोटी रुपये अनुदानापैकी आज रोजी 83 गावातील 40,813 शेतकऱ्यांना 26.12 कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले. सदर अनुदान जमा करण्यासाठी जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी लातूर व विकास माने,उपविभागीय अधिकारी,निलंगा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी दोन दिवस अथक परिश्रम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. जवळपास 12,000 शेतकऱ्यांना आज रोजी अनुदानाचे पैसे प्रत्यक्षरीत्या काढता येतील तर उर्वरित शेतकऱ्यांना मंगळवारपासून पैसे काढता येतील,अशी माहिती गणेश जाधव,तहसीलदार निलंगा यांनी दिली.