निष्ठूरतेचा कळस! सोनं व पैशासाठी गर्भवती सुनेला जीवे मारले

1 min read

निष्ठूरतेचा कळस! सोनं व पैशासाठी गर्भवती सुनेला जीवे मारले

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सिद्धेश्वर गिरी/सोनपेठ: परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील विवाहिता मनीषा जगन्नाथ आचार्य (वय२२) या विवाहितेला बुधवार दि ५ रोजी घरातच सासु,सासरा व नवऱ्यानी मारून टाकत औषध पिल्याचा बनाव करत असल्याच्या प्रकाराने माणसातील माणुसकी हरवल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,परळी तालुक्यातील पाडोळी येथील मनोहर काळे यांच्या मुलीचा विवाह १४ महिन्यापूर्वी आचार्य टाकळी येथील संदिपान आचार्य यांचा मोठा मुलगा जगन्नाथ याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.जावई पाथरी येथील फार्मसी कॉलेजमध्ये नोकरीस असल्याने त्यास हुंडाही मोठ्या प्रमाणात दिला गेला. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच मनीषा हिला कार घेण्यासाठी वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरी छळ सुरू झाला. तसेच लग्नात सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही. म्हणून पतीसह सासू,सासरे घरी मारहाण करीत होते.मुलगी मनीषा हिने हा सर्व प्रकार माहेरी कळवला होता. नागपंचमीसाठी माहेरी गेली असता मनीषाने सासरी जाच होत असल्याने आता परत जायचे नाही. या विचारातून तिने माहेर गाठले खरे! मात्र समाजातील प्रतिष्ठा राखण्यासाठी माहेरी समजूत घातल्यानंतर ती पुन्हा टाकळी येथे तिच्या सासरी गेली माहेरहून लवकर का आली नाहीस. या कारणाने त्याच रात्री नवऱ्याने बेल्टने पुन्हा मारहाण केली होती..
बुधवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी जावयाच्या भावकीतील एकाने मनोहर काळे यांना तुमच्या मुलीची प्रकृती बरोबर नसल्याची माहिती काळे यांना दिली असता. तासाभराच्या आत वडील व इतर काही जण टाकळी येथे तिच्या घरी पोहचले त्यावेळी मनीषास खाली फरशीवर टाकल्याचे त्यांना दिसून आले. हे काय केल अस संदीपान आचार्य यांना विचारले असता मनीषा हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पैसे व सोन्याच्या अंगठीसाठीच नवऱ्यासह सासू सासऱ्यानी संगनमत करून मनीषाला जिवंत मारून टाकल्याची फिर्याद मनोहर काळे यांनी पोलिसांत दिली. सासरकडील तिघा जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी हे करत आहेत.
20 तासानंतर अंत्यसंस्कार
अंबाजोगाई स्वा.रा.ती.रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह सरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आला.सासरच्या मंडळीवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हालणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.सिरसाळा पोलिसांनी
योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माहेरी पाडोळी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत सर्व गाव जागेच होते. मनीषा ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याने गावात सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत. दरम्यान मनोहर साहेबराव काळे यांच्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ संदीपान आचार्य, सासरा संदीपान आश्रोबा आचार्य,सासू संजीवनी संदीपान आचार्य,या तिघांविरुद्ध हुंडाबळी कायद्यासह मनुष्य वधाच्या कलमाखाली सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान या निष्ठुरतेने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असल्याचा प्रत्यय आलेला आहे. पोलीस तपासात न्याय मिळण्याची अपेक्षा मनीषा हिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.