"लाथो के भूत बातो से नही मानते", मनसे आक्रमक..!

1 min read

"लाथो के भूत बातो से नही मानते", मनसे आक्रमक..!

वाढीव वीज बिलावर सरकार कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया देत नसल्याने आता राज्यात मनसे आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलचं तापल आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मनसे देखील वाढीव वीज बिलांवरुन आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
mns
परंतु त्याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे वाढीव वीज बिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.