ऑनलाईन शाळा, दहावीतील विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

1 min read

ऑनलाईन शाळा, दहावीतील विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

कराड तालुक्यातील ओडं येथिल दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळाफास घेवुन आत्महत्या केली आहे.

सातारा : कोरोना काळात सर्वकाही बंद असताना शाळा ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुणाकडे मोबाईल नाही तर कुठे इंटरनेट चालत नाही. कराड तालुक्यातील ओडं येथील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळाफास घेवुन आत्महत्या केली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन नाही,म्हणून या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे 2007 मध्ये निधन झाले होते. वडिलांचे छत्र हरपल्यापासून तिची आई, ती स्वत: तिच्या भावासह कष्ट करुन उदरनिर्वाह चालवत होते. कोरोनामुळे सगळं काही बंद होतं,आता सगळं काही सुरू होत आहे. सरकारी कार्यालय, खासगी कंपन्या वगैरे सुरु झाल्या असल्या तरी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.

मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे तिला अभ्यासाचा तणाव आला होता. काल (29 सप्टेंबर) दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान या घटनेनंतर ओंड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.