उस्मानाबाद दोन पाझर तलाव फुटले, 84 नागरिकांचे स्थलांतर

1 min read

उस्मानाबाद दोन पाझर तलाव फुटले, 84 नागरिकांचे स्थलांतर

पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. पावसाने दोन पाझर तलाव फुटल्याने पुर आला आहे. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला असून कोणतीही जिवितहानी झाली  नाही. पुरातील पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या 2 जणांना काढण्यासाठी एअर लिफ्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन दिवसाच्या पावसानं हाहाकार माजवला आहे. लोहारा, उमरगा परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतात काढून ठेवलेल सोयाबीन गेल वाहून तर दुसरीकडे ऊसाच शिवारही पाण्याखाली गेल आहे. पाण्याच्या प्रवाहाने शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे धरणांतील पाण्यांच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पत्रात वाढ झाली आहे. पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुण्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.