कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

वाहने आणि प्रवासी अडकले, अनेक गावांचा संपर्क तुटला...

कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

औरंगाबाद : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या बहुतेक भागात काल रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. तिकडे औरंगाबादेत पाझर तलाव फुटला आहे. तर जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत.

औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच असल्याने नागरिकांनी चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

अंजना नदीला जोरदार पूर, अनेक गावांशी संपर्क तुटला
कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेला. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटला. अंजना नदीला जोरदार पूर आला आहे. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.

चाळीसगाव-कन्नड भागात ढगफुटी
जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमा भागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे.

हवामानाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ३-४ दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.