पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून   बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी

1 min read

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी

उद्दिष्टा पैकी केवळ 18 टक्के कर्ज वाटप


प्रद्युम्न गिरीकर /हिंगोली :हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ना वर्षाताई गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशासनाच्या आढावा बैठक घेतली यावेळी उद्दिष्ट पैकी केवळ 18 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे समोर आल्यानंतर संतापलेल्या पालकमंत्र्यांनी बँक अधिकार्‍यांची खरडपट्टी काढून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या वर्षीच्या खरीप हंगाम करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 40 हजार शेतकऱ्यांना उदिष्टाच्या केवळ 208 कोटी म्हणजे 18 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. तर जिल्ह्यात 82 टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक कर्ज वितरण झालेले नाही. त्याकरीता सर्व शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरणांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी बॅंकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का ? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची यावेळी माहिती घेत पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरिप हंगाम सुरु होवून महिना झाला आहे तरी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 18 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळा-टाळ किंवा दिरंगाई करत आहे अशा सर्व बँकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बँक निहाय आराखडा तयार करावा. तसेच त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपूरावा करावा. जिल्ह्याकरीता किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे आणि खत उपलब्ध करून दिले. तसेच पेरलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवल्या नसल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या असून किती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याचा पंचनामा करावा. तसेच दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी कृषि, सहकार, रेशीम आणि रोजगार हमी योजना विभागाचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.