पंकजा, कमळ आणि भाजप

पक्षाजी गरज, धोरण आणि आवश्यकता यावरुन काही गोष्टी निश्चित होत असतात, त्या झाल्याही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना संपवण्याचा प्रयत्न होतो आहे असा दावा करणं चुकीचं ठरेल

पंकजा, कमळ आणि भाजप

महाराष्ट्रः भागवत कराडांच केंद्र राज्य मंत्री होणं हे अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं आणि ते एका मोठ्या वादाचं कारणही ठरलं आहे. डॉ. भागवत कराडांना केंद्रात संधी मिळेल का? असा प्रश्न निर्माण केला जात होता. त्यांच्याऐवजी प्रितम मुंडेंना संधी मिळेल अशीही चर्चा केली जात होती. मात्र अचानक डॉ. भागवत कराडांच नाव पुढे आलं. कराड विरुद्ध मुंडे परिवार असाही सामना रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याच दोन दिवस माध्यमांनी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतः पुढे येऊन आपण नाराज नसल्याचं सांगितलं. एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे "एका जत्रेत देव म्हातारा होत नाही आणि एका लुगड्यात स्त्री म्हातारी होत नाही." म्हणजेच एखादा प्रसंग घडला म्हणुन सगळं संपलं, असं राजकारणात कधीही होत नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा विचार करणं हे हवेत इमले बांधण्यासारखं होईल.

पंकजा मुंडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा भाजपमधला सामना रंगवला जातो आहे, खरोखरंच तसं चित्र आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात बघितल्यावर असं दिसतं की असा सामना भाजपमध्ये चालू आहे, त्यांच्यात वादाच्या काही गोष्टी आहेत. हा वाद भाजपच्या महाराष्ट्रातील पर्यायी नेतृत्वासाठी आहे की अन्य कोणत्या कारणासाठी, हे स्पष्ट झालं पाहिजे. राज्यात देवेंद्र फडणविसांना पर्याय म्हणुन पंकजा मुंडेंना बघितलं जातं त्यासाठी हा वाद मुळीच नाही. कारण यापुर्वी, सध्या आणि यापुढेही राज्यातलं भाजपच नेतृत्व म्हणुन फडणवीस असणार आहेत हे जवळपास सर्वच नेत्यांना स्पष्ट आहे. त्यामुळे ते असताना दुसरं नेतृत्व पुढे येईल हा वाद असु शकत नाही. मात्र जिल्हास्तरावर ज्या गोष्टी होत आहेत त्यांमध्ये पंकजा मुंडेंना स्थान असलं पाहिजे, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. परंतु भाजपच्या राजकारणात तसं होताना दिसत नाही, हीच अडचण आहे आणि हेच वादाचं कारण आहे.  

पंकजा मुंडेंना राजकारणापासुन दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यासाठी कोणत्या गोष्टी लागु होतात ते पहाणं गरजेचं आहे. पंकजा मुंडेंचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातुन तब्बल ३५ हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव करण्यात भाजपचेच नेते सहभागी होते असाही आरोप केला जातो आहे. दूसरी गोष्ट म्हणजे पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्ष नेत्या म्हणुन त्यांची निवड केली जाईल अशी आशा समर्थकांना वाटत होती. मात्र रमेश कराड यांची निवड केली गेली. त्यामुळे वंजारी समाजातले कराड पंकजा मुंडेंच्या ऐवजी गेले असं वाटतं. तिसरी घटना म्हणजे प्रितम मुंडेंना केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र तीथेही भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे वंजारी समाजाला नव्याने नेतृत्व दिलं जात आहे असा समज सार्वत्रिक होऊ शकतो.

भागवत कराड आणि रमेश कराड हे वंजारी समाजाचं नेतृत्व म्हणुन पुढे येत असले तरी वंजारी समाजाचं नेतृत्व म्हणुन ते विकसीत होतील की नाही याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. समाजाचं एकसंघ नेतृत्व सध्यातरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडेच जातं. त्यामुळे आताच्या घडीला या समाजामधुन दुसरं नेतृत्व पुढे येण्याची शक्यता दिसत नाही. 'ओबीसी' असा विचार करुनच कराडांना हे मंत्रीपद दिलं गेलं असावं. यावरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडेंच राजकारण संपवण्यासाठीच हे सगळं केलं जात असल्याचं म्हंटल जात आहे.

पंकजा मुंडे विधानसभेत पराभूत झाल्यापासून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्य समितीवर कायम ठेवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना केंद्रीय कार्यकरीणी मध्येही सचिवपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्रातल्या भाजपमध्येही पंकजा मुंडेंच स्थान कायम राहिलं आहे. पंकजा मुंडेंना अधिक काम देत असताना मध्य प्रदेशच्या सह प्रभारी म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्येही पंकजा मुंडेंनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन भाजपसाठी काम केलं आहे. या तीन घटनांमधुन त्यांच भाजपमधील महत्त्व कमी झालेलं नसून ते अबाधीत असल्याचं स्पष्ट होत आहे. प्रितम मुंडेंनाही भारतीय जनता पक्षाच्या राज्य शाखेचा उपाध्यक्ष करण्यात आलं आहे.

समर्थकांकडून नविन येणारं पद ताईंसाठीच आहे अशी आशा निर्माण होते आणि तसं वातावरणही निर्माण केलं जातं. परंतु प्रत्यक्षात हे पद मिळत नाही, तेव्हा काही समर्थकांकडून विशेषतः समाज माध्यमांवरती अशा पद्धतीच्या पोस्ट टाकल्या जातात. परंतु समर्थकांनी व्यक्त केलेली नाराजी नेत्यांनाही वाटत असेलच असं नाही. मुळात राजकारणामध्ये कायमचा शत्रु किंवा कायमचा मित्र कोणीच नसतो. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात पहिल्यांदा लोकसभा निवडणुक लढवलेले रमेश अडसकर पुढे भाजपमध्ये आले आणि गोपीनाथ मुंडेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते बनले. पूर्वी भाजमध्ये असणारे सुरेश धस गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेले आणि पुन्हा भाजपमध्ये आले. जयसिंगराव गायकवाडही मुंडेंच्या विरोधात गेले, त्यांनी अतिशय टोकाची टीका केली, त्यांच्याही बाबतीत असंच झालं. अगदी रक्ताच्या नात्यात असलेले धनंजय मुंडेही गोपीनाथ मुंडेंपासून दूर गेले. एक काळ होता जेव्हा विनायक मेटे मुंडेंचे समर्थक होते आता ते विरोधात आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे बदल सोरीनुसार सातत्याने राजकारणात होत असतात.

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले मतभेद कधीच संपणार नाहीत अशी स्थिती नाही. जेव्हा जेव्हा राजकीय तडजोडी होतील तेव्हा हे दोघेही एकाच मार्गावरुन जातील. किंबहुना अशा पद्धतीच्या राजकीय तडजोडी व्हाव्यात म्हणुनच ही राजकीय स्थिती निर्माण केली जाते किंवा असलेल्या स्थितीचा फायदा घेतला जातो. पंकजा मुंडेंचा जन्म भाजपमध्ये झाला, त्या भाजपमध्येच वाढलेल्या आहेत, त्यांच नावही भाजपमुळेच पंकजा असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे इतर पक्षांसोबत जाण्याचाही पर्याय उपलब्ध होता मात्र त्या गेल्या नाहीत कारण त्यांची विचारसरणी भाजपची आहे. आपल्याला मिळालेल्या किंवा अपेक्षित पदांचा लाभ न झाल्याचा प्रश्न त्याच्याबाबतीत निर्माण केला जातो, तर प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळायला हवं होतं. त्यांनी दोन वेळा निवडून येऊन आपली पात्रता सिद्ध केली आहे. मात्र आधीच मुंडे भगिनींकडे अनेक पदं आहेत त्यात भर न घालता ओबीसी समाजासाठी नवा चेहरा समोर आणण्याचा निर्णय पक्षाने घेतला असावा. यात पंकजा मुंडेंच राजकारण संपवण्याचा किंवा तसा प्रयत्न करण्याचा कोणाचा डाव असु शकत नाही.

पक्षाजी गरज, धोरण आणि आवश्यकता यावरुन काही गोष्टी निश्चित होत असतात, त्या झाल्याही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना संपवण्याचा प्रयत्न होतो आहे असा दावा करणं चुकीचं ठरेल. त्यांच्या प्रमाणेच भाजपमधील अनेक मंडळी अस्वस्थ आहेत. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंच्या विरोधात बबनराव लोणीकरांना कधीच बळ दिलं जात नाही. उलट दानवेंच बळ अधिक वाढत असल्याचं दिसत आहे. लातुरमध्येही संभाजी पाटील निलंगेकरांच्या बरोबर आमदार पवार किंवा रमेश कराड यांसारखे काही नेते आहेत. त्यांच महत्त्व वाढवलं जात आहे, संभाजी पाटील मात्र अस्वस्थ आहेत. ही चर्चा होत नाही. तसंच विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार ही सगळी मंडळी अस्वस्थ आहेत. राजकारणात एकाचा दिवस आला की दुस-याकडे अस्वस्थता होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे काळ यावा लागतो, तोच प्रत्येक गोष्टीवरचा सर्वोत्तम उपाय असतो आणि काळंच ठरवतो की कोणाचे दिवस कधी येणार.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.