मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोठ्या गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. यात थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
परमबीर सिंग यांच्या पत्रातील मुद्दे
IPS परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले.
सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सुचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही देशमुखांनी सांगितले. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.
त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितले. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.
काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आले. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40-50 कोटी रुपये 1750 बार,हॉटेल मधून जमा होतील, असे पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असे परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटले.
कोण आहेत परम बीर सिंह?
परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केले,लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळले, ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते, परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.परमबीर सिंह यांच्या नेतृत्वाखील ठाणे पोलिसांनी देशभरात गाजलेल्या प्रकरणांचा तपास केला. ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी इक्बाल कासकरला अटक केली. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या 2000 कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डींग प्रकरण यांचा तपास केला. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे.
हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे परमबीर सिंह यांचं मूळ गाव. त्यांचे वडील होशियार सिंह हरियाणा नागरी सेवेत अधिकारी होते. त्यांचा भाऊ मनवीर सिंह भडाना हरियाणा पब्लिक सर्विस कमिशनचे प्रमुख आहेत.