परभणीत 12 जणांचे अहवाल निगेटिव्ह

1 min read

परभणीत 12 जणांचे अहवाल निगेटिव्ह

आतापर्यत 36 जणांची तपासणी बुधवारी सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविले.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत कोरोनाचा प्रभाव परभणी जिल्ह्यात झाला नाही. शहरात पुणे-मुंबईवरुन येणारे विद्यार्थी व नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यत 36 जणांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली असुन त्यातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 8 जणांचे अहवाल येणे बाकी असून , बुधवारी ७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

परराज्यात प्रवास करुन जिल्ह्यात आलेले लोक तपासले असता संशयीत रुग्ण आढळत आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १, गंगाखेड तालुक्यातील ५, मानवत तालुक्यातील ५, पाथरीतील ५, सेलूतील ८, जिंतूरमधील १, व परभणी शहरातील ११ आणि इतर ठिकाणाहून आलेल्या एका अशा एकूण ३६ प्रवाशांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. हे सर्व नागरिक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून ९ जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तर २६ जणांना होम कोरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची फेर तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे नागरिकांना आवाहन...

1)    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आदी महानगरातून जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी व विद्यार्थ्यानी पुढील 14 दिवस शक्य तो घरातच थांबावे, गर्दीमध्ये जावू नये.

2)    नागरिकांनी बँकेची कामे. व्यवहार डिजिटल माध्यामाने करावेत,किरकोर कामासाठी बँकेत येण्याचे टाळावे, महत्ताच्या कामाशिवाय स्वतः, मित्रांना किंवा नातेवाईकांना बँकेत आणू नये ,

3)    श्वसनाच्या विकाराचे लक्षणे जाणवत असल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी

कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून जिल्ह्यातील होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समिकतीच्या मार्केट माधील व्यापा-यांना सहन करावा लागत आहे.

- स्वप्नील कुमावत