परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी

1 min read

परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी

जिल्हादंडधिकाऱ्यांनी तीन दिवस कडक संचारबंदी करण्याचे आदेश दिले.

परभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगरपालिका व नगर पंचायतीच्या हद्दीत तसेच लगतच्या 3 किमी परिसरात कलम 144 नुसार गुरुवार दि. 2 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपासून ते दि. 5 जुलै 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला. असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक परभणी, सर्व उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, सर्व तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक तसेच पेट्रोलपंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्री करावी. कृषी बी-बियाणे, खते वाहतूक त्यांची गोदामे व दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार आणि कापूस खरेदी केंद्र, आदी व्यक्ती, समुहाला सुट राहील.