नांदेड : संपुर्ण देशात आणि जगभरात राजस्थानमधील जयपुर हे पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे ठिकाण देखील आहे. आता गुलाबी शहराच्या पंक्तीला एक गुलाबी गावही बसणार आहे. हे गुलाबी गाव साकारतंय नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्ह्यातलं साप्ती हे गाव. गावातील स्त्रियांना उभारी देण्यासाठी व त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील या गावाने आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील साप्ती हे गाव 'पिंक व्हिलेज' म्हणून राज्याच्या नकाशावर उभारी घेणार आहे.
'माझे गाव सुंदर गाव' या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत साप्ती गावच्या विकासासाठी गावकरी दिवस रात्र झटत आहेत. गावात शुद्ध पेयजल, शौचालय, रस्ते, वीज, शिक्षण, पांदनरस्ते, गांडूळखत निर्मिती, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण अशा कामांच्या माध्यमातून हे गाव विकासाची घोडदौड करत आहे.