औरंगाबादमध्ये प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवण्यासाठी ‘सारथी’चे नियोजन

सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून औरंगाबादेत सारथीच्या प्रशिक्षण पायलट प्रोजेक्टसाठी पूरक वातावरण उपलब्ध करून दिल्या जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सर्व उद्योजकांनी व्यक्त केला.

औरंगाबादमध्ये प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवण्यासाठी ‘सारथी’चे नियोजन

औरंगाबाद: औरंगाबाद औद्योगिक विकासाचे महत्त्वपूर्ण ठिकाण असून उद्योग क्षेत्राला उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबवणे हे प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास पुरक ठरणारे आहे. त्या पार्श्वभूमिवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत औरंगाबादमध्ये मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवण्याचे नियोजन असल्याचे, संस्थेचे संचालक उमाकांत दांगट यांनी येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत दांगट बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, कौशल्य विकासचे बी. एन. सुर्यवंशी यांच्यासह उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमण आजगावकर, प्रसाद कोकील, राहुल मोगले, अर्जुन गायकवाड उपस्थित होते.

दांगट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक ओळख निर्माण करणाऱ्या औरंगाबाद सारख्या उद्योग नगरीत जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास विभाग यांच्यासह उद्योजकांच्या सहकार्यातून या ठिकाणी सारथी संस्था बदलत्या काळाच्या गरजेप्रमाणे मराठा समाजाच्या तरूण तरूणींसाठी औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबवू इच्छिते. त्यादृष्टीने उद्योजक संघटनांनी लहान, मध्यम आणि मोठे उद्योगांसाठीच्या मनुष्यबळाची आवश्यकता, त्यासाठीचे प्रशिक्षण, तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी लागणारे प्रशासकीय आणि आर्थिक सहाय्य या बाबींसह पाच वर्षाचा प्रशिक्षण कृती आराखडा तयार करून सादर करावा. सदर प्रस्तावावर संस्थेचे संचालक मंडळ निर्णय घेतील, असे दांगट म्हणाले.

कोकाटे यांनी पारंपारिक ते अद्यावत रोजगाराला पूरक असलेल्या विविध प्रशिक्षणाची नवतरूणांना गरज आहे. त्यादृष्टीने सारथीच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचे असून यामध्ये प्रथम प्राधान्याने उद्योग क्षेत्राशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव करावयाचा आहे. त्यादृष्टीने उद्योजकांनी संकल्पना सादर करावी. या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना कौशल्य, कौशल्यवृद्धी आणि कौशल्य अद्यावत करणे या पद्धतीने करावी. जेणे करून प्रशिक्षणार्थीला अद्यावत ज्ञानासह टिकून राहण्यास सहाय्य मिळेल.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार उपक्रम राबवण्यात येत असून सारथीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सदरील प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) श्रेणी सुधारणा करणे आवश्यक असून या संस्थेतील उपयुक्त, चांगल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाला सारथीने सहाय्य करावे, असे सांगितले. उद्योजकांच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून औरंगाबादेत सारथीच्या प्रशिक्षण पायलट प्रोजेक्टसाठी पूरक वातावरण उपलब्ध करून दिल्या जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सर्व उद्योजकांनी व्यक्त केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.