परभणी : शहरातील नानलपेठ व नवामोंढा पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला सुमारे ७५ लाख रुपयांचा गुटखा आज नष्ट केला आहे.
नानलपेठ पोलिसांनी १८ गुन्ह्यातील ६५ लाख २३ हजार ६९६८ रुपयांचा तर नवामोंढा पोलिसांनी १६ गुन्ह्यातील दहा लाख ८२ हजार ४३७ रुपयांचा गुटका अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कच्छवे यांच्यासह पंचासमक्ष नष्ट केला. हा गुटखा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी 2002 पासून प्रलंबित असलेल्या १६ गुह्यातील मुद्देमाल आज पोलिस ठाण्याच्या मागील मोकळया जागेत जाळून नष्ट केल्याची माहिती दिली.
तर नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी १८ गुन्ह्यातील ६५ लाख ८२ हजार ९६८ रुपयांचा गुटखा धार रस्त्यावरील डंपिंग ग्राऊंडवर नष्ट केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा नष्ट करण्यात आला आहे. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कच्छवे यांच्यासह नवामोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक तट, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, फौजदार शैलेश जाधव, फौजदार रमेश गायकवाड, कर्मचारी माधव दंडे, विठ्ठल कटारे, विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते. तर धार रस्त्यावर नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.