शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही  प्रदूषण वाढतय...

1 min read

शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही प्रदूषण वाढतय...

देशातील शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. ही लोकसंख्या देखील शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे.

वाहने, औद्योगिक क्षेत्र यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करताना सर्वसाधारणपणे शहरी प्रदूषणाचा विचार केला जातो. मात्र, प्रदूषणाची समस्या ही केवळ शहरांपुरती मर्यादित नाही तर ग्रामीण भागांमध्येही प्रदूषणाची समस्या तितक्यात तीव्रतेने भेडसावत आहे. ग्रामीण भागांतील प्रदूषणासंदर्भात अधिक अभ्यास आणि त्याचे विश्लेषण होण्याची गरज आहे. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी आणि आयआटी मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. देशातील शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. ही लोकसंख्या देखील शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मुंबई येथील संशोधक देशभरातील प्रदूषणाचे विश्लेषण करत आहेत.
भारतामध्ये सुमारे १०.५ लाख लोकांचे मृत्यू हे हृदय किंवा फुप्फुसांच्या आजारामुळे कमी वयात होतात. पीएम २.५ या प्रदूषकाचा सामना करावा लागल्याने हे मृत्यू होतात. यातील ६९ टक्के मृत्यू हे शहरीकरण न झालेल्या भागातील आहेत, असेही यामध्ये उघड झाले आहे. प्रदूषणाचे स्रोत भिन्न असले, तरी पीएम २.५ या प्रदूषकामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये तेवढाच धोका आहे. प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आराखडा आखताना सर्वसाधारणपणे वाहने, उद्योग आणि कंपणीनंतर उरलेले खुंट जाळल्याने निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष केंद्रित केले जात असले, तरी प्रदूषणाचे इतर स्रोतही तेवढेच महत्त्वाचे आहेत. यामध्ये वीटभट्टी, कचरा जाळणे, चुलीसाठी लागणारे जळण याचा समावेश आहे. यामुळे स्वच्छ हवा कार्यक्रमामध्ये या स्थानिक बाबींचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा आयआयटी मुंबईच्या प्रा.चंद्रा व्यंकटरमण यांनी व्यक्त केली.
भारतामध्ये प्रदूषणाची माहिती गोळा करण्यासाठी अपेक्षित यंत्रणा नसल्याने हवेच्या प्रदूषणाचा स्तर आणि विश्लेषण हे एक मोठे आव्हान असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागामध्ये प्रदूषणाची पातळी स्थानिकांसाठी तेवढीच घातक असली, तरी त्यावर उपाययोजना आणि त्यासाठीची आरोग्य यंत्रणा, गरजेचा असलेला निधी याकडेही लक्ष दिले जात नाही. प्रदूषणाच्या या स्थानिक घटकांचा विचार झाला, तर भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता येईल, असे यामुळे अधोरेखित झाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.