हिंगोली/ प्रद्युम्न गिरीकर: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेल्या एका युवा नेत्याला गावातच कोंडून ठेवल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या बाबत मोठी गुप्तता पाळण्याचा प्रयत्न देखील झाला परंतू दबक्या आवाजात या घटनेची उलट सुलट चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय मात्तबर पातळी सोडून राजकारण करीत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कळमनुरी विधानसभा मतदार संघातील एका ग्रामपंचायतीच्या प्रचाराकरिता एका माजी लोकप्रतिनिधीचे चिरंजीव प्रचाराकरिता गेले असता. गावातील आपल्या कार्यकर्त्याच्या प्रचाराकरिता दाखल झालेल्या या युवा नेत्याची खबर एका प्रमुख नेत्याला झाली. त्यातून दादागिरीचे राजकारण करीत. त्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देत बंदोबस्त करण्याचे सांगितले. आणि जमलेल्या लोकांनी युवा नेत्याला व त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर अरेरावी आणि दादागिरी करीत, त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. या बाबत मोठी गुप्तता पाळण्याचा प्रयत्न देखील झाला. परंतु ही बातमी हिंगोली येथे पोहचली लगेच काही जणांनी गावात धाव घेत युवा नेत्याची सुटका केली. तो पर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. घटनेला दोन दिवस उलटल्या नंतर या बाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली.
आजपर्यंत राजकारणात समोर सामोर तत्व आणि विचाराने लढणे हि परंपरा राहिली आहे. परंतु काही नेत्यांनी पातळी सोडून सुरु केलेले राजकारण आता निंदेचा विषय ठरू लागले आहे.