प्रामाणिक पत्रकारितेचं भीषण वास्तव..

1 min read

प्रामाणिक पत्रकारितेचं भीषण वास्तव..

कोरोना महामारीने संपुर्ण भुमंडळात घातलेल्या थैमानाने समस्त जग हतबल झालंय.. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.. प्रत्येक क्षेत्रावर कोरोनामुळे एक टांगती तलवार आहे..
अनेक पत्रकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सेवा बजावणारे अनेक योध्दे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत, काही जण रोगाच्या भीषणतेमुळे दगावत आहेत तर काही महागडी हॉस्पिटल्समुळे व योग्य वेळी न मिळालेल्या उपचाराअभावी..
गेल्या अनेक महिन्यांपासुन
लातुरचे एक पत्रकार गंगाधर सोमवंशी कोरोनाग्रस्त होते.. सामाजिकदृष्ट्या एक प्रामाणिक पत्रकार म्हणून सोमवंशी परिचित होते..
आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे हे समजल्यानंतर ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले कारण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते..त्यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे हा खुलासा झाला आहे.. पॉकेट पत्रकारिता या प्रकारात बहुदा हे मोडत नसावेत म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली..

हजार पत्रकारांमागे असे मोजके पाच ते दहा पत्रकार असतील ज्यांना "बाकीची कमाई" करता येते आणि ती पचवताही येते..
माझ्या पाहण्यातही काही असे पत्रकार आहेत की जे पात्रतेपेक्षा अधिकची कमाई करतात, महागड्या गाड्या, सुखवस्तू वापरतात, ज्यांच्याकडे विपुल प्रमाणात अपेक्षापेक्षा अधिक साधनसुचिता आहे आणि ते त्यांच्या एकंदर Social Behaviour वरुन सहजरीत्या दिसतं, पण लेखनीशी कटीबद्ध असलेले बहुतांश पत्रकार सोमवंशींसारखे देखील आहेत की जे खासगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणून ते शासकीय रुग्णालयात दाखल होतात..
आर्थिकदृष्टया जे पत्रकार गरीब आहेत त्यांना सरकारतर्फे आणि संबंधित वर्तमानपत्र, Media Group किंवा Channel यांनी विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.. त्याचबरोबर त्यांच्या भविष्यकाळासाठी देखील काही तरतुद केली पाहिजे..
सोमवंशी शासकीय रुग्णालयात दाखल झाले पण हा झुंजार पत्रकार कोरोनसोबतची लढाई हरला..

हे प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे पण असे किती लोक असतील ज्यांना केवळ खासगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणून आपला जीव गमवावा लागला हे देवच जाणे..
पक्षपाताचाआरोपस्विकारून मला इथं आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या #मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा ज्याचा मुख्य उद्देश "आर्थिकदृष्टया दुर्बल" असणार्या व्यक्तींना माफक दरात किंवा अपवादात्मक परिस्थितीत मोफत उपचार उपलब्ध करून देणे असा होता..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ही संकल्पनाच मुळात तेव्हा अस्तित्वात आली ज्यामुळे असंख्य लोकांना नवं आयुष्य लाभलं.. मुळ संकल्पना देवेंद्रजी यांची होती पण त्या नंतर शेवटच्या दुर्बल व्यक्तीला उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले ते Omprakash Shete सर यांनी..
माझ्या परिचयातीलही असे काही लोक आहेत ज्यांना या योजनेद्वारे आणि शेटे सरांच्या प्रयत्नांमुळे नविन आयुष्य मिळालंय.. मी ज्या भागात राहतो त्या भागात त्यांना देवदूत मानलं जातं कारण मृत्युच्या दाढेत उभ्या असलेल्या असंख्य रुग्णांवर योग्य ते उपचार त्यांच्यामुळे झाले..
सध्याच्या या महामारीच्या काळात अशाच संकल्पनेची आणि शेटेंसारख्या "देवदुताची" आवश्यकता आहे ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना योग्य वेळी योग्य ते उपचार मिळतील, खासगी रुग्णालयाद्वारे होणारी लूट थांबवता येईल..

आपल्याला कोरोनापासुन वाचवनारे पत्रकार, पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे खरे योद्धेच जर असुरक्षित असतील तर सामान्यांचं काय हा यक्ष प्रश्न आहे..
रुग्णांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर मरण पावलेत तर काही कोरोनाला हरवून पुन्हा लोकांच्या सेवेत रुजू झालेत..
इथे मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो माझा बालमित्र डॉ. Vedkumar याचा जो अनेक महिन्यांपासुन मुंबईतल्या नायर रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहे, जो की या दरम्यान स्वत:देखील कोरोना पॉझिटीव्ह निघाला होता..

कोरोनाबद्दल अचुक माहिती पुरवून जनजागृति करणारे सोमवंशींसारखे अनेक पत्रकार,पोलिस दलातील अनेक बांधव असे बहुसंख्य योद्धे कोरोनाच्या जबरदस्त विळख्यात अडकले आहेत , राज्यात अनेक पोलिस कोरोनाग्रस्त आहेत तर काही मृत्यूमुखी पडले आहेत..

जेव्हा एखादा कामगार संघटनेचा प्रश्न उभा राहतो आणि त्याला ही मीडिया पेटवायचा प्रयत्न करते तेव्हा या सर्वांनी आपल्या पत्रकारांकडेही त्याच काळजीपूर्वक दृष्टीने बघावं त्यांना न्याय द्यावा अन्यथा असे अनेक गंगाधर सोमवंशी मृत्युमुखी पडतील..

कोरोना बस हो गया भाई,
अब चले जा तू..
और बर्दाश्त नहीं कर सकते हम..

शुभं भवतू..!!

  • ओम देशमुख