सरनाईकांचा 'प्रताप' प्रायोजितच

मुंबईचे तत्त्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बाँम्ब टाकला आणि त्याचे हादरे राज्याच्या गृहमंत्र्यांना बसले होते. आताही अशाच पद्धतीचा पॉलिटीकल लेटर बाँम्ब महाराष्ट्राच्या राजकारणात प्रताप सरनाईकांकडुन पडला आहे.

सरनाईकांचा 'प्रताप' प्रायोजितच

महाराष्ट्रः काही चिठ्या आणि पत्र अशी असतात, जी मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडवुन देतात. याला 'लेटर बाँम्ब' म्हणतात. असा लेटर बाँम्ब पडला, की अनेक ठिकणी त्याचे हादरे बसु लागतात. यापुर्वी मुंबईचे तत्त्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बाँम्ब टाकला आणि त्याचे हादरे राज्याच्या गृहमंत्र्यांना बसले होते. आताही अशाच पद्धतीचा पॉलिटीकल लेटर बाँम्ब महाराष्ट्राच्या राजकारणात पडला आहे. सरनाईकांनी मोठा प्रताप केला आणि पत्र टाकुन ते असं म्हणाले की, "पुरे झालं उद्धव साहेब आता आपण भाजपकडे जाऊ." वास्तवीक पाहता, सरनाईकांना आता हे सगळं पुरे झालं, आपण पुन्हा भाजपसोबत गेलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळुन शिवसेना फोडत आहेत असं वाटतं आहे. मुळात प्रताप सरनाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधुन शिवसेनेत आले आहेत.

प्रताप सरनाईक मुंबईतल्या ठाण्याचं प्रतिनिधीत्व करतात. ठाण्यातुन सरनाईकांच शिवसेनेत येणं आणि त्यामुळे अनेकांच्या साम्राज्याला त्रास होणार. ठाण्याच्या साम्राज्यात सध्यातरी शिवसेनेचं प्राबल्य आहे, त्यातही ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर यावर शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि तिथे एकनाथ शिंदे हे महत्तवाची भूमिका बजावत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधुन जितेंद्र आव्हाड यांच प्राबल्य आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला मजबुत करण्यासाठी आव्हाड प्रयत्न करत आहेत.

ठाण्यामध्ये सध्या मराठा आणि आग्री समाजाचा मोठा वाद सुरु आहे. यात अनेकजण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत काम करणं, जुळवुन घेणं सरनाईकांना देखिल कठीण जात आहे आणि त्यातुन यांना मुक्तता हवी आहे. त्यामुळे सरनाईकांनी आपल्या भावना उद्धव ठाकरेंना बोलुन दाखवल्या, असं अनेकांच म्हणणं आहे. त्या पत्रातील वाक्यांचे अर्थ अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावले आणि तशा पद्धतीने त्यावर आपली मतं मांडायला सुरुवात केली.

ब-याच जणांना वाटतं की हे पत्र उद्धव ठाकरेंनीच लिहुन घेतलं, कारण आपण भाजपच्या विरोधात गेल्याने चौकशीचा ससेमीरा लागला आहे, त्यामुळे आता आपण भाजपमध्ये जायला हवं, असं सरनाईकांनी त्यात लिहिलं आहे. काही जणांना वाटतं की सरनाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या डावांची जाणिव होऊ लागली आहे. ते शिवसेना फोडत आहेत. अनेक ठिकाणी अशी उदाहरणं देखिल आहेत. त्यामुळे या सगळ्यात शिवसेनेची हानी झाली असं वाटतं आहे. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती झाली तरी काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करत आहे. तरीही ज्या जागा शिवसेनेला मिळणार आहेत त्यात बंडखोरी किंवा पक्षांतर होणारच आहे. सध्या भाजपसोबत शिवसेना जवळपास दिडशे जागा लढवते आहे. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला शंभरपर्यंतच्या जागा मिळणंसुद्धा कठीण आहे. त्यामुळे उरलेल्या जागांवर शिवसेनेला दगाफटका होणारच आहे. तिथुन लोक राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये जातील. त्यामुळे ही एक मोठी अडचण शिवसेनेसमोर आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला सगळ्यांत मोठा फटका बसणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका गेले अनेक दशकं शिवसेनेच्या ताब्यात आहे, हेच शिवसेनेचं खरं बळ आहे. 'एकवेळ राज्य नसलं तरी चालेल परंतु महानगरपालिका असली पाहिजे' असं राजकीय धुरीण सांगतात. राज्यात वाटेकरी बरेच आहेत मात्र मनपामध्ये वाटे नाहीत. यात वाटेकरी येणं हे अत्यंत धोक्याचं असेल. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दोन्ही पक्षांची स्थिती मुंबईत फारशी प्रभावशाली नाही. भाजप दुस-या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपने मनसे सोबत जुळवलं तर भाजपला अधिकाधिक जागा मिळतील आणि मनपा भाजपच्या ताब्यात जाईल.

मुंबई मनपा भाजपच्या ताब्यात जाण्याचा अर्थ आहे, शिवसेनेचा एक मोठा आर्थिक स्त्रोत हातुन जाणं आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे पुर्वी केलेली कामं उघड होणं. त्यामुळे भाजपकडे जाण्याचं पाऊल आपण टाकायला हवं, हे शिवसेनेच्या मनात असण्याची शक्यता असु शकते. या दोन्ही पक्षांतली एक बाब म्हणजे महाराष्ट्रात अशा ब-याचशा जागा आहेत जिथे भाजप आणि शिवसेना एकमेकांशिवाय जिंकु शकत नाहीत. शिवसेना कितीही आव आणत असली, तरीही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत कराव्या लागलेल्या तडजोडी शिवसेनेच्या स्वभावातल्या नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनातील भावना सरनाईकांच्या रुपाने व्यक्त होऊ लागल्या आहेत असंही म्हणता येऊ शकतं आणि मग भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया देखिल पूर्ण होऊ शकते.

शिवसेनेला मुख्यमंत्री पदाला पाठिंबा आणि मुंबई महानगरपालिका देऊन भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फायदा करुन घ्यावा. भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा राखण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याने या दोन्ही पक्षांच भलं होणार आहे. परंतु भाजपला आपल्या मित्रपक्षांना दाबण्याची वृत्ती बदलावी लागेल आणि सतत 'आमच्यामुळेच तुम्ही' हे म्हणणं शिवसेनेला थांबवावं लागेल. महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्ववादी विचारांची ताकद वाढवायची असेल तर या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याची चर्चा या पत्राच्या निमित्ताने सुरु झाली. त्यामुळे या पत्राचा स्फोट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तंबुत होणार आहे.

सरनाईकांची जी प्रकरणं बाहेर निघत आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनात भिती बसली आहे. शिवसेनेचा एक-एक नेता अडचणीत येताना दिसतो आहे त्यामुेळे ही भिती स्वाभाविक आहे. यातुन मुक्त व्हायचं असेल तर भाजपशी युती करणं गरजेचं आहे अशी उपरती सरनाईकांना होणं स्वाभाविक आहे. सरनाईकांच बाहेर आलेलं हे पत्र, बाहेर आलं की मुद्दाम आणण्यात आलं? हा प्रश्न आहे. कारण ज्या पत्रावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला आवकचा शिक्का आहे, असं पत्र केवळ सरनाईकांच्याच हातात असु शकतं. म्हणजे सरनाईकांकडूनच हे पत्र बाहेर काढण्यात आलं, हे स्पष्ट आहे.

या पत्रावरील तारखा पाहिल्या तर जवळपास दहा दिवसांच्या फरकाने म्हणजेच, 20 जूनला हे पत्र बाहेर आलं. त्यापुर्वी 9-10 जूनला जे भेटीगाठींच सत्र सुरु होतं, त्याच दरम्यान हे पत्र देण्यात आलं आहे. फक्त ते उशिरा बाहेर आलं.

हा सगळा सुनियोजित कार्यक्रम आहे. सगळ्यांच्या वाचा बंद व्हाव्यात, कुणाच्या मनात आशा पल्लवीत व्हाव्यात यासाठीची ही तरतूद आहे. कदाचित भाजपची धार बोथट होऊ शकते, पण तसं घडलेलं नाही. शिवसेना भवनासमोरचा किंवा कोकणातील गोंधळ पाहिला तर दोन्ही पक्षांतील कटु संवाद सुरुच आहे. या पत्राची उपयोगिता उरली नव्हती का? आणि पत्र देऊनही गोष्टी घडत नसल्यामुळे पत्र प्रकरण बाहेर काढुन हे सगळं शांत करण्याचा प्रयत्न होतो का? हा देखिल प्रश्न आहे. यात एक गोष्ट मात्र नक्की, शिवसेनेसोबत जाणं कदाचित भाजपच्या समर्थकांना आवडणार नाही परंतु भाजप आणि शिवसेनेला एकमेकांशिवाय पर्याय नाही. यांचा मतदार दोन्ही पक्षांचा एकत्र विचार करणारा आहे. परंतु हे स्वप्न आहे, हा आदर्शवाद आहे आणि राजकारणात अशी स्वप्न, असा आदर्शवाद कधीही पुर्ण होत नसतो.

  • सुशील कुलकर्णी


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.