पुलाचे रूपांतर स्विमिंग पुलात

1 min read

पुलाचे रूपांतर स्विमिंग पुलात

मन्याड प्रकल्प, नदीवरच्या पुलाला तलावाचे स्वरूप, पुलावर खड्डेच खड्डे...!

ज्ञानेश्वर परांडे/ अहमदपूर: लातूर- नांदेड या दोन जिल्ह्याला जोडणा-या नदीवरच्या पुलाला दि.13 जून रोजी झालेल्या पावसामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कारण रस्त्यावरील पुलावर खड्डेच खड्डे आहेत. अहमदपूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 हा जातो, लातूर नांदेड रोडवर अहमदपूर पासून जवळच सांगवी (सुनेगाव) या गावाशेजारी मन्याड नदी असून या नदीवर असलेला पूल हा वाहूतुकीसाठी दोन जिल्ह्याला जोडणारा एकमेव पर्याय आहे. या पुलावर दि.13 जून रोजी झालेल्या मान्सून पावसामुळे पुलाचे रूपांतर हे स्विमिंग पुलात झाल्याचे दिसत आहे.
पुलावरील पाणी खाली वाहून जाणारे छिद्र बुजल्यामुळे व रस्त्यावरील पडलेल्या खड्यामुळे पुलावर पाणी साचण्यात भर पडलेली दिसत आहे.
सद्य स्थितीला वाहतुकीसाठी अन्य कोणताही पर्याय नसून दुचाकीस्वार व इतर वाहनांना जीव मुठीत ठेवून प्रवास करणे कठीण होत आहे; या सर्व गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक करत पुलाची कुठलीही डागडुजी न करता कसलीही देखभाल व दुरुस्ती केलेली नाही.

एकंदरीत या रोडवरील वाहतूक जीवघेणी असून होणारा सर्व प्रकार हा चिंताजनक असल्यामुळे शासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन हा अडथळा मार्गी लावला अशी जनतेची अपेक्षा आहे.