पुनश्च हरी ओम ...
जनता पास प्रशासन नापास

1 min read

पुनश्च हरी ओम ... जनता पास प्रशासन नापास

१०० दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रशासन १००% नापास झाल्याने कोरोना गावपातळीवर पोहचला .

सुधीर बिंदू/ परभणी: तो :- भाऊ , कोरोना कसा होता ? कोरोना झाल्यावर माणूस मरतो का ? कोरोना झाला तर घरच्या सगळ्यांना दवाखान्यात नेतात ? दवाखान्यात चहा पाणी जेवण सगळ देतात ?
असे प्रश्न तो धडाधड विचारत होता त्याला कसली गडबड झाली होती ते माहित नव्हत पण मास्क न लावल्याने मी जरा चिडलेलाच होतो.
मी जरा घुश्यातच त्याला मास्क का लावला नाहीस व संचारबंदीत का फिरतोस असे विचारले.
तो :- शंभर दिवस झाले घरी बसुन आहे हातावर पोट आपल होत नव्हत तेवढ सगळ संपल .शेतीतल काम जमत नाही म्हणुन कोणी बोलवत नाही .बायको आजारी आहे कंबर तिला कामावर जाऊ देत नाही .फार हाल चालु आहेत,उपासमार चालु आहे. गरीबांना कोणी मदत देते, आपल्याला कोण देईल ?
मी :- रेशन तर मिळाले असेल ना ?माणसी पाच किलो तांदुळ गहु सरकारने दिले आहेत की .
तो :- पचकन रस्त्यावर थुकुन छदमी हसला मायचा **** म्हणुन कडक शिवी दिली.
निसते तांदुळ खायचे का ? त्याला तेल ,मीठमिरची लागल का नाही ?
मी :- जाऊ दे,काही काम सांगतो ते कर.
तो :- तुम्ही एखाद दिवशी काम देताल, मोदीन हे दिवाळी पर्यत राहील म्हणुन सांगितलय .बर ते कोरोना कसा होतेय ते सांगा
मी :-कोरोना झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्याने आणि अस तोंडाला न बांधता बोंबलत फिरल्यान कोरोना होतो.
तो आनंदात म्हणाला बर
मी :-म्हणालो जा घरी घरातच बस
नाही बाहेरच फिरतो कोरोना व्हायला पाहिजे
मी :- आरे पागल झालास का ?
तो :- कोरोना झाल्यास सगळ घरदार दवाखान्यात नेतील, दोन टाईम खायला व चहापाणी पण मिळन, घरी उपाशी मरण्यापेक्षा दवाखान्यात खाऊन पिऊन तरी मरु

तब्बल शंभर दिवसापासून अधिक काळ घरातच बसुन कोरोनाची साखळी तोडण्याच्या कामात राज्यातील जनता पास झाली असली तरी कोरोनाच्या संक्रमण वाढण्या पासुन थांबवण्याच्या प्रयत्नात प्रशासन सपशेल नापास झाले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणा मुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे .कोरोना तर वाढत आहे पण त्याच बरोबर जनतेच्या मनात भितीयुक्त संतापाची भावना वाढत आहे.

मार्च महिन्यात सुरवातीला जनता कर्फ्यु मग चौदा दिवसाचा लॉकडाऊन व पुढे तीस जुन पर्यंत लॉकडाऊन हे सगळे जनतेने कडेकोट पालन केले.
सुरवातीला लॉकडाऊन हे शासनाकडे पुरेशी आरोग्य व्यवस्था नसल्याने हे लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे सांगितले जनतेने ते जीवाच्या भितीने मान्य ही केले सुरवातीला एक महिना ,दोन महिने तीन महिने लोक कामधंदा सोडुन घरीच बसले .
लोक घरी बसले तरी कोरोना घरी बसला नाही तो मात्र वाढतच होता . सरकार उपाययोजनांच्या बैठका घेत जनतेला अश्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते . पण प्रत्यक्षात व्यवस्था मात्र होत नव्हती .

कोरोना काय आहे त्याचा रुग्णांना काय त्रास होतो याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात येत नव्हती पण साधारण नव्वद टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण किंवा त्रास नसल्याचे आरोग्य यंत्रणा दबक्या आवाजात सांगु लागली.

माझ्या तालुक्यात एकुण अकरा लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यातील फक्त दोघांना सर्दी ताप खोकला झाला होता ईतर नऊ जणांना कुठलाही त्रास झाला नाही .
कोरोना बाधित झालेल्या अनेकांनी सोशल मिडीयावर आपले व्हिडिओ टाकुन कोरोना सोबत राहण्याचे न घाबरण्याचे आवाहन केले.

परवा एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर त्याच्या संपर्कातील,त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही .

यातुन दोन बाबी समोर येतात कोरोनाची लागण झालेल्या सगळ्यांना त्रास होत नाही व कोरोनाची लागण झालेल्यां सगळ्या पासुन काळजी घेतल्यास कोरोनाचा प्रसार होत नाही.

आता अधिकृत घोषणा झाली नसली तरी कोवीड १९ चे संक्रमण हे सामाजिक स्तरावर झाल्याचे मान्य करुन शासनाने आता वेगळ्या उपाययोजना करायला हवेत .

१०० दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रशासन १००% नापास झाल्याने कोरोना गावपातळीवर पोहचला .

आता काय चुकले कुठे चुकले याचा फारसा विचार न करता प्रशासनाने गाव पातळीवर व शहरात वार्ड पातळीवर आरोग्य यंत्रणा उभी करावी .कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा उभी करण्या ऐवजी प्रशासन संचारबंदी बंद असे हिटलर शाही आदेश देऊन हे बंद ते बंद असे तुघलकी निर्णय देत आहे व गर्दी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

लॉकडाऊन हा खर तर व्यवस्था उपलब्ध असलेल्या देशांचा उपाय होता रोज मजुरी करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या देशात वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील याचा विचार कॉपी पेस्ट प्रशासनाने केला नाही.

जागतिक आरोग्य संघटना व शास्त्रज्ञ जगातील बहुतांश नागरीक कोवीड १९ ने बाधीत होतील असा ईशारा पुर्वीपासून देेेत आहे .

यासाठी सरकारने आपल्या नागरीकांना कोरोना होऊ नये या साठी केलेला प्रयत्न योग्य होता व त्यात नागरीकांनी मोठा सहभाग पण दिला .पण दुर्दैवाने आता कोरोना ग्रामीण भागात हातपाय पसरु लागला आहे .व हातावर पोट असणारे लोक आता घरी बसुन उपासमारीची वाट पाहु शकत नाहीत. सरकारने तातडीने आपल्या उपाय योजना बदलुन नागरीकांना रोजगार व रोग दोन्ही बाबतीत अश्वस्त करणे गरजेचे आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती प्रवाही ठेवणे गरजेचे असते .ती जर एका जागी अडवली तर ती गंभीर प्रश्न निर्माण करु शकते.

या साध्या सुत्राचा विसर राज्यातील जिल्हाधिकारी महोदयांना पडला आहे .यंत्रणा राबवुन कोरोनाचे नियंत्रण करण्या ऐवजी जनतेला कोंडण्याचे प्रकार सुरु आहेत. एका विशिष्ट वेळेत बाजारपेठ बँका सुरु ठेऊन गर्दी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे आणि राज्यात व्यवस्थाच नाही म्हणुन जनतेला रोगाचा सामाना करत आवश्यक वस्तु घ्याव्या लागत आहेत .

आवश्यक काय असा प्रश्न निर्माण होत आहे. तुटलेला नळ बदलणे हे नळ तुटलेल्या घरासाठी अत्यंत आवश्यक असते. जे प्रशासनाच्या दृष्टीने अनावश्यक असले तरी .
जनतेला काय प्रश्न येऊ शकतात ते कसे सोडवायचे याचा विचार न करता प्रशासन व शासन तुघलकी कारभार करत आहे.

ऐन संचारबंदीत युरीया खतासाठी पाथरीत हजारो शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागते.

प्रतिबंधीत क्षेत्रात पिठ संपलेल्या लोकांना पिठासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते तिथले नागरीक त्यांना प्रतिंबधीत क्षेत्रातील असल्याने दळण देण्यास नाकार देतात.
प्रशासन प्रतिबंधीत क्षेत्रात गिरणी सुरु ठेवल्यावरुन गुन्हा दाखल करतात.

शहरातील बँकेत दररोज हजार व्यवहार होतात आता बँकेची वेळ कमी झाल्याने हे सगळे नागरीक त्या सहा तासात होणाऱ्या तीनशे व्यवहारात आपला नंबर लागावा यासाठी गर्दी करतील .

अशी एक नाही शेकडो उदाहरणे देता येतील पण प्रशासन व शासन जनतेच्या या सामान्य प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही.

नागरीकांची मानसिकता बदलते आहे भिती ची भावना संतापात झाल्यास या वर नियंत्रण मिळवता येणार नाही राज्यात अराजकता माजेल राज्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे.
पुनश्च हरी ओम करतांना प्रशासनाने अधिक जबाबदार होणे गरजेचे आहे.
-सुधीर बिंदू मो.9923049007