पवारांच्या राजलिला

1 min read

पवारांच्या राजलिला

शरद पवार नावाचं व्यक्तीमत्व मला नेहमीच खुणावत आलेलं आहे. एक ज्येष्ठ राजकारणी, एक सर्वसमावेशक नेतृत्व, राजकारणातील एक चमत्कार, एक आश्चर्य अशी माझ्या मनातील त्यांची प्रतिमा. आणि या मराठी माणसाच्या कौशल्याविषयी नितांत आदर देखील आहे. सर्वाप्रमाणे आजवर मी केलेले पवारांच्या विषयातील सर्वच अंदाज चुकले हे नम्रपणे मान्य करतो. इतरांसारखीच मलाही पवारांची ओळख झालीच नाही. मी नेहमी पवार एक राजकारणी, पवार एक नेता, पवार एक चमत्कार, म्हणजेच पवार एक व्यक्ती आहेत असेच समजत होतो. पण राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर पवार हे 'मल्टीपल पर्सनालिटी' आहेत हे लक्षात आले. मी त्यांनी बहुआयामी समजत होतो. पण ते बहुव्यक्तीमत्व आहेत हे समजायला पत्रकारितेची दोन दशके जावे लागली.

ते कुठे कांही बोलतात तर नेमके त्याच्या विपरीत दुसरीकडे बोलतात. ते कधी संविधानाचे खंदे समर्थक असतात तर कधी शरीयतचे पाठीराखे. ते पुरंदरेंच्या सोबत व्यासपीठावर सत्कार स्विकारतात, तर कधी पुरंदरेच्याच पुरस्काराला तीव्र विरोध करतात.

राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत पाहताना दिसत असलेले पवार ते नव्हतेच, जे या आधी बघितले होते. राजकारणात जात बघितली जाऊ नये हे सांगताना त्यांनी औरंगाबादच्या चंद्रकांत खैरेंची 'जात' उघड करत त्यांच्या अडचणीत वाढच केली. आणि बहुसंख्याक समाजाला एक संदेश दिला की, दोन दशकांपेक्षा अधिक काळ एक अल्पसंख्य व्यक्ती तुमचे प्रतिनिधीत्व करत आहे. आणि पुढे झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. याला कारण एमआयएमपेक्षा शरद पवार यांनी जागी केलेली मराठा अस्मिता होती.
खैरेंच्या निमित्ताने ते बाळासाहेबांच्या विषयात देखील बोलले. राष्ट्रवादीचा गृहमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करवली. एक जातीयवादी, धर्मांध शक्ती अशी बाळासाहेबांची प्रतिमा शरद पवारच राज्यभरात घेऊन गेले. त्याच बाळासाहेबांनी कधीच जात बघितली नाही असे सांगत त्यांचे प्रचंड कौतुक केले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात हाच फरक आहे. बाळासाहेब कधीच बोलल्यापासून हटले नाहीत आणि पवार हटल्याशिवाय दुसऱ्यांदा बोलले नाहीत.

राजकारणात यश मिळवायचे असेल तर सकाळी लवकर उठावे लागते, अशी झोंबणारी टीका राज ठाकरे यांच्यावर केली. आणि 'तुमच्या सोबत एक विचार घेऊन लोक आहेत याचे कौतुक वाटते', असे सांगत राज ठाकरे यांना शाबासकीची थापदेखील पवारांनीच दिली.

मोदी आणि पवार हे समीकरण तर नेहमी कोड्यात टाकते. मोदी पवारांना आपले राजकीय गुरू म्हणाले. कधी बारामतीत तर कधी दिल्लीत देशाच्या पंतप्रधानांकडून स्वतःला गुरू समजून घेण्यात पवार धन्यता मानत होते. मोदींनी दिलेला हा मोठेपणा पवार सहर्ष स्विकारत होते. आणि मुलाखतीत राज ठाकरे मोदींच्या जवळकीतेविषयी बोलत होते, तेव्हा मात्र मोदींसोबत आपला कसलाच संबंध नाही असेच सांगण्याचा पवारांचा प्रयत्न होता.

राज्याची सत्ता मिळविण्यासाठी जातीच्या राजकारणाचा सर्वात जास्त आधार घेणारे शरद पवारच आहेत. मधला काळ आठवा. अनेक संघटनांना पवारांनी बळ दिले. संघटना उभ्या केल्या. खास करून शिवसेना ज्या भावना आणि मताच्या आधारावर उभी आहे, त्या मताधाराला धक्का लावण्यासाठी पवारांनीच अनेक जातीय संघटनांना बळ दिले. शिवसेनेचा पाया कमकूवत करण्याचा प्रयत्न केला. आज अनेक महापुरूषांची नावे आता शिवसेनेपेक्षा पवारांची राष्ट्रवादी अधिक वापरत आहे. राज्यात सत्ता मिळवायची असेल तर मराठा सोबत ओबीसी जवळ आला पाहिजे हे लक्षात घेत प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेतेपद अशी महत्वाची पदे ओबीसी नेत्यांच्या हवाली केली. आव्हाडांसारख्या वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्याचे महत्व वाढवले. भुजबळांची कमतरता जाणवायला नको याची पुरेपूर काळजी पवारांनी घेतली. पुरंदरे यांच्यावर आव्हाडांच्या करवी वार करत नवी जातीय समीकरणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेच पवार मुलाखतीत म्हणत होते. जातीय तेढ वाढविणाऱ्या संघटना वाढायला लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत तर पवारांची भूमिका खुपच आश्चर्यकारक आहे. मुलाखतकर्ते राज ठाकरे आणि त्यांचे बंधू सेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे दोघेही आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका नेहमीच मांडत आले आहेत. शरद पवारांनी त्या भूमिकेचे समर्थन तर केलेच नाही, उलट त्याची व ती भूमिका मांडणाऱ्या नेत्यांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणाच्या विषयाला सरकारमध्ये असताना गती दिली. विरोधी पक्षात आल्यावर त्याच्या आंदोलनाला बळ दिले. सरकारला धारेवर धरले. आणि राज ठाकरे यांच्या समोर आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली. त्यामुळे नक्की कोणते पवार खरे? हा प्रश्न पडतो.

राज्यातल्या सत्तेवर असताना पवारांना कर्जमुक्ती हा शेतकरी वर्गाची समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग वाटत नव्हता. तरीही कर्जमुक्तीची घोषणा करत प्राप्त स्थितीत दिलासा देण्याचे काम त्यांच्या सरकारने केले. सत्ता बदलली आणि पवार विरोधी पक्षात गेले. त्यांना कर्जमुक्ती आवश्यक वाटू लागली. कर्जमाफी हा एकमेव मार्ग असल्याचे पवार बोलू लागले, आणि मुलाखतीत परत कर्जमुक्ती हा पर्याय नसल्याचे पवार बोलत होते. आता परत राज्यात सत्ता आली की, कर्जमुक्तीची घोषणा करून पवार मोकळे झाले आहेत.

मुंबई मराठी माणसांची हा मुद्दा सेनेचा आणि मनसेचा. मराठी माणसांची मुंबईत गळचेपी सहन करणार नाही अशी भूमिका घेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा मुंबईत गोंधळ घातला आहे. अशा वेळी पवारच त्यांच्या या गोंधळाच्या भूमिकेवर टीका करत होते.
आणि मुलाखतीत मात्र राज ठाकरे यांच्यासमोर मान्य करत होते की, मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होत आहे. शिवसेना आणि मनसेला मुंबईला विरोध करताना मुंबई सर्वांची ही भूमिका घ्यायची, जितेंद्र आव्हाडसारख्या नेत्याला त्या पक्षावर सोडायचे आणि मुलाखतीत मात्र गुजरातचा देशाच्या आर्थिक राजधानीवर डोळा आहे, अशी भाषा करायची ही पवारांची दुसरी प्रतिमा नवल वाटावी अशीच आहे. भाजपला विरोध करण्याचा कॉमन अजेंडा पवारांनी सोयीने स्विकारत आपले अजून एक व्यक्तीमत्व समोर आणले. मेट्रोची भिती आणि गुजराती अतिक्रमण यावर पवार बोलले. ती भिती मान्य केली आणि यूपी-बिहारी लोकांच्या रहिवासाबद्दल एक चकार शब्द बोलले नाहीत. हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवला आणि मग पवारांचे नक्की धोरण काय? असा प्रश्न पडला.

पवार नेमके कसे ? राज ठाकरे सोबत प्रांजळपणे बोलणारे पवार हे खरे की, राजकीय व्यासपीठावर आग्रही भूमिका घेत आसूड ओडणारे पवार खरे. संविधानाला सर्वोच्च मानणारे पवार खरे की, शरीयतचा कायदा राहायलाच हवा असे आग्रहाने बोलणारे पवार खरे ? मुंबई सर्वांचीच असे विधान करणारे पवार खरे की, गुजराती माणसांचे अतिक्रमण वाढत आहे असे बोलणारे पवार खरे ? कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी आक्रोश करत आसूड ओढणारे पवार खरे की, कर्जमुक्ती हा एकमेव मार्ग नाही असे सांगणारे पवार खरे ?
जात महत्वाची नसते असे सांगत खासदार चंद्रकांत खैरे यांची 'जात' काढणारे पवार खरे ? बाळासाहेब ठाकरे यांना जातीयवादी म्हणत त्यांनीच 'जात' पाळली नाही, असे सांगणारे पवार खरे?

महाभारतातील वृंदावनात रासलिला करणारा कृष्ण विविध रूपात वृंदावनातील प्रत्येक गोपाळ आणि गोपिकांसोबत दिसायचा म्हणे. तो प्रत्येकाला आपल्यासोबतच आहे असे वाटायचे. कृष्णाची ती रासलिला आणि पवारांची आणि ही 'राजलिला' मला तर सारखीच वाटते. पवार देखील प्रत्येक सभेत प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला आपलेच वाटतात.

मी शरद पवार साहेबांच्या या 'मल्टीपल पर्सनालिटी'मधील अजून कांही व्यक्तीमत्वाचा शोध घेत आहेच. कारण पवार साहेबांचा राजकीय अनुभव हा माझ्या एकुण वयापेक्षा दहा वर्षांनी अधिकचा आहे. त्यामुळे कोणतेही भाष्य न करता मनात आलेले प्रश्न या लेखात उपस्थित करत आहे.