राणीसाहेब सेनेतच कशा?

1 min read

राणीसाहेब सेनेतच कशा?

नगरच्या आमदार साहेबांनी सरदार तर राष्ट्रवादीत घेतले पण आपल्या राणी साहेबांना मात्र सेनेतच कसे काय ठेवले हा प्रश्न आता जिलह्यातील सेना नेते विचारत आहेत.

राजा आमदार झाला. आणि विकासाची दुहाई देत राजाने पाच नगरसेवक सेनेच्या तिरावरून पार करत राष्ठ्रवादीच्या तिरावर आणले. राज्याच्या उपमहाराजांनी दिमाखात स्वागत केले. आणि मुख्य राजा मात्र रूसला. मुख्य राजाचा रूसवा काढण्यासाठी पाच नगरसेवक परत सेनेच्या तिरावर सोडण्यात आले. ते बंधन काय ते परत एकदा बांधून झाले. आपल्याच पक्षाच्या प्रमुखाच्या नेतृत्वात काम करण्याऐवजी दुस-या राजाचे नेतृत्व मान्य करत तैनाती सैनिक म्हणून ठेवण्यात आले पण..
ज्या स्थानिक राजाने पाच जणांना सेनेत घेतले त्या राजाची राणी मात्र अजून सेनेतच आहे.
घडला प्रकार असा..
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नीने सुपा जिल्हापरिषद सर्कल मधून सेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवली आणि त्या निवडून देखील आल्या. निलेश लंके यांची पारनेर तालुक्यातील लोकप्रियताच मोठी असल्याने सेनेची उमेदवारी असली तरी राणी लंके या विजयी झाल्या. आजही त्या जिल्हापरिषदेच्या सभागृहात सेनेच्या सदस्य म्हणून बसतात. आणि निलेश लंके यांच्या बरोबरीने विकास कामे करतात.
निलेश लंके यांनी विकासाला सोबत आणि बळ म्हणून पारनेरची पाच नगरसेवक सेनेतून राष्ट्रवादीत घेतली खरी पण त्याच विकास कामासाठी सुप्याच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या आपल्या पत्नीचा प्रवेश राष्ट्रवादीत करण्याचे ते विसरून गेले. किंवा पक्षांतरबंदी कायद्याचा फटका नाहक बसू नये म्हणून त्यांनी ते टाळले असावे.
एकीकडे सेनेकडून विकास होणार नाही असे सांगत पाच नगरसेवक निलेश लंके यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या पत्नीना म्हणजे राणी लंके यांना मात्र सेनेतच ठेवले गेले. आता सेनेच्या ज्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तेच सेनेचे नेते आता राणी लंके यांना राष्ट्रवादीत स्थान का नाही असा प्रश्न विचारत आहेत.
राजा आणि सरदार राष्ट्रवादीत असले तरी राणी मात्र अजूनही सेनेत असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात जोरदार आहे.