पाऊस, छत्री आणि राजकारण

आजकाल एखादा नेता पावसात गेला की मोठी चर्चा होते. नेत्यांच पावसात जाणं म्हणजे माध्यमांसाठी खाद्य आहे. नेत्याने पावसात भिजणं, स्वतः छत्री घेऊन उभं रहाणं हे दुर्मिळच.

पाऊस, छत्री आणि राजकारण

महाराष्ट्रः आजकाल एखादा नेता पावसात गेला की मोठी चर्चा होते. नेत्यांच पावसात जाणं म्हणजे माध्यमांसाठी खाद्य आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात साता-याच्या सभेत शरद पवार पावसात भिजले आणि त्या सभेने राजकारणाचा रंगच बदलला, अशा बातम्या समोर आल्या. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भर पावसात गाडी चालवत पंढरपूरला गेले आणि त्याचिही मोठी बातमी झाली. अशाच पावसात पंतप्रधान पत्रकारांशी बालले त्याच्याही बातम्या रंगल्या. पाऊस, नेता आणि छत्री याचं खुप मोठं कौतुक राजकारणामध्ये आजकाल नव्याने निर्माण झालं आहे. माध्यमांना अशा बातम्यांच प्रचंड कौतुक वाटतं. वैचित्र्य, दुर्मिळता हे सगळं असेल तेव्हा एखाद्या गोष्टीची बातमी होते. नेत्याने पावसात भिजणं, स्वतः छत्री घेऊन उभं रहाणं हे दुर्मिळच आहे म्हणून त्याची बातमी होते.

यापूर्वी अशा पद्धतीने पावसात नेते भिजले नाहीत का? तर अनेक नेते पावसात भिजले, त्यांचे छायाचित्रही उपलब्ध आहेत. प्रमोद महाजनही पावसात भिजायचे आणि आपल्या भाषणात लोकांनाही भिजवून टाकायचे. परंतु त्यांचं भिजणं विशेष चर्चेत आलं नाही कारण तेव्हा माध्यमं कमी होती. शरद पवारांचं भिजणं मात्र "पावसात भिजलेला सह्याद्री" वगैरे अशा पद्धतीने गोष्टी रंगवून जगासमोर मांडण्यात आलं आणि त्याचं खुप मोठेपण निर्माण झालं. पावसात भिजलं की यश मिळतं असं एक नवं सूत्र लोकांना मिळालं. परंतु पावसात न भिजता स्वतः छत्री घेऊन, भाषण करता येऊ शकतं हे नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

मोदी भर पावसात पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर छत्री होती, ती पत्रकारांनी पकडलेली नव्हती तर त्यांनी स्वतः एका हातात छत्री घेऊन पत्रकारांशी हा संवाद साधला. त्यांच्या आजूबाजूला असलेले मंत्रीही आपली छत्री स्वतःच घेऊन उभे होते. म्हणजे जर संवादच साधायचा असेल तर तो छत्री घेऊनही साधला जाऊ शकतो, हे मोदींनी दाखवून दिलं. त्यानंतर मोदींच्या समर्थकांनीही या भाषणावरुन शरद पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली. पवारांच पावसात भिजणं, मोदींच छत्री घेऊन थांबणं आणि त्यानंतर महाराष्ट्राचे नंबर एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भर पावसात गाडी घेऊन पंढरपूरला गेले. खरंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन स्वतः गाडी चालवत पंढरपूरला जाण्याची ही दूसरी वेळ आहे. तरीही उद्धव ठाकरेंच्या या प्रवासाची चर्चा, यासंदर्भातल्या बातम्या खुप मोठ्या प्रमाणात गाजल्या.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे घेत असलेली ही काळजी माध्यमांतून त्यांच मोठेपण अशा पद्धतीने दाखवली गेली. मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच काम घरात बसून रहाणे किंवा गाडी चालवण्याचं नाही तर महाराष्ट्र राज्य चालवणे असं आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासाची जोरदार चर्चा झाली. पंतप्रधान मोदी पावसात छत्री घेऊन थांबल्यानंतर त्याची तुलनाही चालू झाली. अनेक नेत्यांना छत्री धरण्यासाठी माणसं लागतात परंतु मोदी स्वतः छत्री घेऊन उभे होते याचीही चांगलीच चर्चा झाली. एकूण काय तर छत्री, पाऊस आणि नेता यांची चर्चा संपूर्ण देशात गाजते, त्यामुळे यानंतरच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल तर पावसात भाषण करण्याचा एक नवा प्रयोग नेत्यांनी करुन बघायला हरकत नाही.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.