मासोड ते दिल्ली सातवांचा राजकीय प्रवास...!

1 min read

मासोड ते दिल्ली सातवांचा राजकीय प्रवास...!

मातोश्री रजनीताई सातव यांचा राजकीय वारसा असला तरी मासोड पंचायत समिती सदस्य ते लोकसभा खासदार व आता राज्यसभा खासदार म्हणून राजीव सातव यांचा प्रवास राजकारणात भविष्य वाटचाल करणाऱ्या अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

हिंगोली-प्रद्युम्न गिरीकर
मातोश्री रजनीताई सातव यांचा राजकीय वारसा असला तरी मासोड पंचायत समिती सदस्य ते लोकसभा खासदार व आता राज्यसभा खासदार म्हणून राजीव सातव यांचा प्रवास राजकारणात भविष्य वाटचाल करणाऱ्या अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू निकटवर्ती याच बरोबर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून राजीव सातव हा युवा चेहरा काँग्रेसच्या पटलावर गेल्या काही वर्षात झळकत आहे. माजी मंत्री राहिलेल्या रजनीताई सातव यांचे सुपुत्र असलेले राजीव सातव यांनी विधिज्ञ म्हणून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. परंतु राजकारणाचे बाळकडू त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. राजकीय वारसाचा वापर न करता पहिल्यापासून सुरुवात करण्याच्या उद्देशाने ऍड. राजीव सातव यांनी 2002 मध्ये मसोड पंचायत समिती गणातून निवडणूक लढविली. या विजयानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. त्यानंतर 2007 मध्ये खरवड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद कृषी सभापती म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. याच दरम्यान 2008 मध्ये युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाल्यानंतर सातव यांनी पक्ष संघटन कार्यात स्वतःला झोकून दिले. 2009 मध्ये कळमनुरी विधानसभेत विजय संपादन करीत त्यांनी आमदारकीवर मोहर उमटविली. युवा चेहरा आणि संघटन कार्यामध्ये संयम ठेवून काम करण्याची हातोटी लक्षात घेऊन त्यांची युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी 2010 मध्ये त्यांची निवड झाली. या संधीच्या माध्यमातून सातव यांनी देशातील अनेक काँग्रेस नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण केले. पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक विविध प्रकल्प शासनाकडून ओढून आणण्यात ते यशस्वी ठरले. 2014 मध्ये संपूर्ण देशात काँग्रेस विरोधी मोदी लाट असताना ऍड. सातव यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव करून दिल्ली नेतृत्वाला स्वतःची चमक दाखवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते या निवडणुकीत गारद झाले असताना सातव यांनी मिळविलेला विजय हा पक्षश्रेष्ठींना दखल घेण्यास भाग पाडणारा होता. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत पक्षाने यापुढे त्यांना पक्षीय पातळीवरच्या विविध जबाबदाऱ्या देखील सोपविल्या. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर बरोबरच 2017 मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीदरम्यान सौराष्ट्र विभागाचे प्रभारी म्हणून सातव यांनी काम बघितले. त्याचबरोबर पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत दरम्यान निवड समिती प्रभारी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे होम ग्राउंड असणाऱ्या संपूर्ण गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून देखील सातव यांच्याकडेच जबाबदारी आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्यासह ऍड. राजीव सातव हे राहुल गांधींच्या निकटवर्ती यांमध्ये संबोधले जात. यातील सिंधिया व पायलट हे दोघेही काँग्रेस बाहेर पडल्याने राहुल गांधींच्या युथ टीमची जबाबदारी आपसूकच सातवांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लोकसभा खासदारकीच्या कार्यकाळात सातव राष्ट्रीय स्तरावरील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत मित्रत्वाचे संबंध निर्माण केले. यामध्ये केवळ काँग्रेसचेच नेते नव्हे तर भाजपच्या गडकरीं पासून ते शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या पर्यंत त्यांचा स्नेहबंध जोडलेला आहे. पक्ष पातळीवरील त्यांच्या संबंधामुळे दिवसेंदिवस पक्षातील महत्त्व वाढू लागले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व नुकतेच बाहेर पडलेले सचिन पायलट या दोघांची सातव यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सातव यांना तातडीने राजस्थानला रवाना केले होते. आमदारांची फुटाफूट रोखण्यामध्ये सातवांची भूमिका महत्त्वाची मानल्या जाते. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आता सातवांचे नाव देखील येऊ लागल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील हिंगोली सारख्या छोट्याशा जिल्ह्यातून उदयास आलेल्या या राजकीय नेतृत्वाने आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन दुसऱ्यांना खासदार होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस एनलायझर कडून हार्दिक शुभेच्छा...