राजकीय सोयीसाठी अधिकारी बळी

आपल्या सोयीचा अधिकारी यावा यासाठी मंत्रालय बंद असताना बदली आदेश निघतात. सहा महिण्याच्या आत बदली होते. मॅटच्या स्थगीती नंतर देखील अधिका-यावर दबाव येतो. आणि याच तणावात हा अधिकारी मृत्यू पावतो. दोन पुतण्यांच्या संबंधात एक मराठी अधिकारी बळी जातो.

राजकीय सोयीसाठी अधिकारी बळी

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा मृत्यू राजकीय सोय बघत आपल्याला हवा तो अधिकारी नेमण्याच्या राजकीय इच्छेचा बळी आहे. या मृत्यूस पुण्यातील वजनदार मंत्री आणि मंत्रालयातील हुजरे अधिकारी जबाबदार आहेत.
पदावर नियुक्ती होऊन सहा महिणे उलटत नाहीत तोच कोरोनाच्या संक्रमण काळात त्यांची बदली पिंपरी चिंचवड मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. तडकाफडकी त्यांच्या जागी येऊ पाहणा-या अधिका-यांनी चार्ज देखील घेतला. मात्र मॅटने स्थिगीती दिल्याने गायकवाड यांची बदली रद्द झाली. मात्र गायकवाड यांच्यावर दबाव कायमच राहिला. याच दबावातून हा ह्र्दयविकाराचा धक्का आल्याचे बोलले जात आहे.
new-sahebrao

साहेबराव गायकवाड हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील रिधोरे या गावचे माढा तालुक्यात हे गाव येते. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टींग झाली ती सातारा जिल्ह्यात. १० ऑगस्ट २०१७ रोजी तिथे ते नियुक्त केले गेले. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मात्र सातारा येथे तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच १७ सप्टेबर २०१९ रोजी त्यांची बदली पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली. मात्र कांही विशिष्ट व्यक्तीला या पदावर घेण्याच्या अट्टहासापोटी मंत्रालयातून बदलीचे आदेश काढण्यात आले. गायकवाड यांच्या पुणे येथील पदस्थापणेला जेमतेम सात महिणे पूर्ण झाले होते.
विजय देशमुख हे अधिकारी राज्याच्या माजी कृषी आयुक्ताचे पुतणे आणि राज्यातील मोठ्या पुतण्याच्या जवळचे अधिकारी असल्याचे समजते. या दोन पुतण्यातील सख्ख्यामुळेच ही अवेळी बदली झाली अशी महसुल वर्तुळात चर्चा आहे. विजय देशमुख यांनी ऑर्डर निघताच पदभार देखील स्विकारला याच काळात पुण्यात कोरोना थैमान घालत होता हे विशेष.
गायकवाड यांनी या बदलीच्या विरोधात मॅट मध्ये धाव घेतली आणि ५ मे रोजी या न्यायाधिकरणाने बदलीच्या विरोधात निर्णय देत गायकवाड यांची पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार गायकवाड यांनी पदभार स्विकारला देखील. मात्र मुंबईतून विशिष्ट बंगल्यातून सतत फोन करून पुण्याचा नाद सोडण्याचा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात होता. याच दादागिरीच्या सल्ल्याला गायकवाड बळी पडले. मागच्या कांही दिवसापासून ते तणावात होते. आणि याच तणावत त्यांनी ह्रदयविकाराचा धक्का बसला. जहांगीर रूग्नालायात उपचार घेण्याआधीच त्यांची प्राण ज्योत मालवली.

आपल्या मर्जीतील अधिकारी सोयीच्या पदावर बसविण्यासाठी राजकारणी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. आणि मलाईदार पद मिळावे यासाठी अधिकारी देखील आपल्या सहकारी वर्गाला अडचणीत लोटू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मंत्रालय कोरोनाबाधीत झाल्याने निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद असतानाच्या काळात या बदलीच्या ऑर्डर काढण्यात आल्या होत्या हे येथे विशेष उल्लेखाने नमुद करावे लागेल. पुण्यात कोरोनाचा कहर असताना ही बदली प्रशासनाला आवश्यक का वाटली? पुणे रेड झोन असतानाही देशमुख यांना येण्याची घाई का होती. कोण असा बडा व्यक्ती होता जो मॅटच्या आदेशानंतर देखील गायकवाड यांच्यावर दबाव टाकत होता. गायकवाड यांना आलेल्या फोनचा तपास करून या व्यक्तीविरोधात कारवाई व्हायला पाहिजे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.