रजनीकांतची अचूक टायमिंग ...!

रजनीकांतची अचूक टायमिंग ...!

चित्रपट गाजतो तो त्याच्या सगळ्याच गोष्टीतील अचूक   टायमिंग साधल्यामुळे. संवाद गाणी,
फाईट, प्रणयदृष्य ते थेट रिलीज करण्याच्या तारखा यात अचूक टायमिंग आवश्यक असते.        
जयललिता यांचा आकस्मिक मृत्यु, त्यामुळे नेतृत्वाअभावी दिशाहीन झालेला अण्णा द्रमुक, थकलेले
एम. करुणानिधी व त्यांच्या वारसांमधील सत्तासंघर्ष यात  'थलैव्वा' रजनीकांतने राजकारण प्रवेशाची
केलेली घोषणा. ही अशीच अचूक टायमिंगची गोष्ट आहे.
त्याने राजकारणात सक्रीय व्हावे, यासाठी गेल्या दोन दशकापासून त्याचे चाहते देव पाण्यात घालून
बसले होते. (चाहते त्यालाच देव समजतात ही गोष्ट वेगळी) अखेर चाहत्यांची प्रार्थना फळाला
येताना दिसत असली तरी वेड्या चाहत्यांच्या स्वप्नांना अाकार देण्याचे महाकठीण आव्हान
रजनीकांतसमोर आहे. त्यात तो कितपत यशस्वी होतो, यावर त्याचे राजकारणातील यशापयश
अवलंबून असेल. राजकारण हे रजनीकांतसारख्या साध्या-भोळया अभिनेत्यांचा प्रांत नव्हे, त्यामुळे
त्याचाही 'अमिताभ' व्हायची भीती आहे. ते काही असो, पण पडद्यावर त्याची एन्ट्री जशी वादळी
असते तशी ती राजकारणात देखील वादळी ठरली आहे. रजनीकांतच्या ताज्या घोषणेमुळे दक्षिण
भारताच्या राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत दिसू लागलेआहेत. 
रजनीकांतने नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासोबत तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234
जागा लढविण्याची घोषणा नववर्षाच्या पूर्वसंध्येला केली. ही घोषणा तिथल्या लोकांसाठी जितकी
महत्वाची आहे तितकीच ती भाजपा आणि काँग्रेससाठी देखील महत्वाची आहे. 
गेल्या काही दिवसात रजनीकांत आणि प्रधानसेवकांच्या जवळीकतेवर चर्चा होत आहे. काही
प्रसंगात ते दोघे एकत्र आल्याने ही चर्चा सुरु झाली. रजनीकांत भाजपात जाईल, यावर जे जे
राजकीय विश्लेषक आपल्यापरिने मत व्यक्त करीत होते, ते रजनीच्या स्वतंत्र पक्षाच्या घोषणेने
चाट पडले असतील. रजनी आणि प्रधानसेवक यांची मैत्री जरी असली तरी जिथे रजनीने
जयललितासारख्या राजकीय व मानसिकदृष्टया 'अहम ब्रह्मास्मि...' समजून निर्णय थोपणाऱ्या
लोकनेत्यास विरोध करण्याचे धाडस केले, तिथे पुन्हा त्याच प्रकृतीच्या लोकांसोबत जाण्याची चूक
रजनीकांत करेल, हे पटत नाही. तामिळनाडू काबीज करण्यासाठी भाजपाला रजनीकांत यांची निकड
असेल, मात्र रजनीकांतला तशी कसलीच गरज नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे.  त्यामुळे एका
विजयी होत असलेल्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आणि मतदार सहजच रजनीच्या नव्या पक्षाला
मिळणार आहे.
राजकारणात सक्रीय होण्यासाठी रजनीने साधलेले टायमिंग अफलातून आहे. सध्या तामिळनाडूत
राजकीय अस्थिरता आहे. जयाअम्माच्या निधनानन्तर पलानीस्वामी आणि पनेरसेल्वम यांच्यातील

सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. एकीकडे अण्णाद्रमुकमध्ये बेदिली माजलेली असताना दुसरीकडे
करुणानिधी यांच्या वारसदारामध्ये भाऊबंदकी सुरु आहे. द्रमुक सर्वेसर्वा करुणानिधी यांनी
दशकापूर्वीच आपला उत्तराधिकारी म्हणून पुत्र एम. के. स्टॅलिन यांची निवड घोषित केली आहे.
मात्र या घोषणेने दुसरे पुत्र एम. के. अलागिरी नाराज झाले व त्यांनी थेट आपल्या पित्यालाच
आव्हान दिले. तामिळनाडूत दर पाच वर्षानी सत्तेची अदलाबदल केली जाते, आणि या सूत्रानुसार
जयाअम्मा यांचे निधन आणि  थकलेले  करुणानिधी यांची  जागा भरण्याची कुवत असलेला एकही
नेता दोन्ही पक्षाकडे नाही.

तामिळनाडूत सध्या नेतृत्वाची पोकळी आहे. रजनीकांतची लोकप्रियता व त्याच्यावर लोकांचा
असलेला विश्वास त्याला यश मिळवूनही देईल. मात्र ते टिकवून ठेवणे मोठे जिकीरीचे असेल.
त्यासाठी रजनीने आपला समकालीन अभिनेता विजयकांत आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन
यांच्या राजकीय कारकीर्दीवरुन बोध घेतला पाहिजे. विजयकांतने जितक्या वेगाने राजकारणात
प्रचंड यश मिळवले, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले, त्यापेक्षा अधिक वेगाने त्याला अपयशालाही
तोंड द्यावे लागले. विजयकांत हेही तामिळ जनतेचा मोठा पाठिम्बा असलेले अभिनेता. त्यांनी
एमडीएमके हा स्वतंत्र पक्ष स्थापन करून जयाअम्मा आणि करुणानिधी यांना आव्हान देण्याचा
प्रयत्न केला. 
 अमिताभ 'बोफोर्स'चे किटाळ घेऊन राजकारणातून बाहेर फेकला गेला.
सप्टेम्बर 2005 मध्ये राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्या विजयकांत यांनी अवघ्या वर्षभरात झालेल्या
विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश पटकावले. 2011 मध्ये तर चक्क द्रमुकला मागे सारून
मोठी झेप घेत एमडीएमके पक्षाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान निर्माण केले. विजयकांत हे
2011 ते 2016 या काळात विरोधी पक्ष नेते होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला
तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांची सोबत ही तेथील राजकीय गरज आहे.
एमडीएमकेचे अतिरिक्त बळ द्रमुकला जाते की अण्णाद्रमुकच्या गळाला लागते यावर बरेच काही
अवलंबून असेल. आता रजनीकांत यांची एंट्री झालेली असल्याने विजयकांत यांच्या भूमिकेला
महत्व येणार आहे, यात शंका नाही. विजयकांत यांचे यशापयश रजनीकांतसाठी एक प्रकारे 
राजकीय वाटचालीत दिशादर्शक असेच आहे.

रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. मात्र खरे आव्हान
पुढेच असेल. तामिळी मतदार आपल्या नेत्यावर अतिप्रेम करतो. प्रसंगी पक्ष व नेत्यांसाठी
कसलाही विचार न करता आपला जीव देण्यापर्यंत त्यांची मजल जाते. त्यामुळे समर्थकांच्या

अपेक्षाचे प्रचंड मोठे ओझे रजनीच्या डोक्यावर असणार आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही
तर काय होईल, याचाही विचार रजनीकांतला करावा लागेल, नव्हे तो केलेलाच असेल. 
हिन्दीतला सुपरस्टार अमिताभ बच्चन हे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना केवळ मित्रप्रेमाखातर
राजकारणात प्रवेश करून खासदार झाले. पण त्यांना मतदार संघात लक्ष देता आले, ना लोकांच्या
अपेक्षा पूर्ण करता आल्या. त्यामुळे टर्म पूर्ण होण्यापूर्वी त्यांना आपली खासदारकी सोडावी लागली.
शिवाय राजीव यांच्या विरोधकांनी 'बोफोर्स'च्या निमित्ताने उडवलेला  भ्रष्टाचाराचा सर्वाधिक चिखल
अमिताभ यांच्या स्वच्छ प्रतिमेवरच बसला. परिणामी,  लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान
अमिताभचे खुप मोठे नुकसान झाले. अमिताभ यांच्या पडद्यावरील तरुणाईचा आदर्श, गोरगरिब
जनतेचा तारणहार, देशभक्त, नायक, सुपरस्टार अशा स्वच्छ प्रतिमेस तडा जाऊन त्यांचे सिनेमेही
अपयशी ठरले. पुढे सिनेमात काम मिळणे बन्द झाले. मोठा ब्रेक घ्यावा लागला. शिवाय, काही
काळ अज्ञातवासातही जावे लागले. आर्थिक संकट ओढवले. त्यामुळे पुनरागमन करताना त्यांना
निर्मात्यांच्या दारोदारी फिरावे लागले. पडत्या काळात मेहुलकुमार, यश चोप्रा यांनी साथ दिली
म्हणून अमिताभ पुन्हा सावरू शकले. हा अनुभव रजनीकांतने लक्षात घ्यायला हवा. कारण एक
चुकीची कृती, अयोग्य निर्णय संपूर्ण कारकिर्द संपुष्टात आणू शकतो, याचेही भान राखणे आवश्यक
आहे. तामिळ चाहत्यांनी रजनीकांतला देवासमान मानले आहे. इतकेच नव्हे तर त्याला देवाचा
दर्जा दिला आहे. त्यामुळे तो जी कृती करेल किंवा निर्णय घेईल, तो देवाचीच आज्ञा असेल. आणि
ती काळाच्या कसोटीवर उतरली नाही तर डोक्यावर घेऊन नाचलेल्या रजनीला चाहते, समर्थक,
मतदार डोक्यावरुन वाईट पद्धतीने फेकून देण्यात कसलीच कसूर करणारा नाही. त्यामुळे रजनीला
प्रत्येक पाउल काळजीपुर्वक आणि परिणामाचा विचार करूनच उचलावे लागेल, यात शंका नाही.
- विजयकुमार स्वामी,लातूर


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.