राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं, राऊतांचा हल्लाबोल

एक दिवस हीच वेळ ते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर आणतील

राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं, राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण ठाकऱ्यांपासून पवारापर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्यांचे आईबाप काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले. अशा शब्दांत शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्रावर सडकुन टीका केली आहे.

एक दिवस हीच वेळ राणेपुत्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरे नाही, असे फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे. राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. ”तुम्ही बिनबापाचे आहात काय?” असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल.

'उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?,' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील.महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल, असा इशाराही राऊतांनी सरतेशेवटी अग्रलेखातून भाजपला दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.