पळा पळा! कोण पुढे पळे तो

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

पळा पळा! कोण पुढे पळे तो

महाराष्ट्रः लहानपणी आपण सर्वांनीच ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. अशीच शर्यत सध्या राजकारणात चालू आहे. परंतु राजकारणातला ससा कोण आणि कासव कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. सध्या तरी पळा पळा, कोण पुढे दिसे तो अशीच स्थिती आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि पंतप्रधान कार्यालयाने त्या भेटीचा फोटो ट्विट केला. पंतप्रधानांची भेट घेणं यात काहीही गैर नाही. मुळात ही एक नियमीत होणारी प्रक्रीया आहे. कोणताही मंत्री, नेता पंतप्रधानांची भेट घेऊन वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करु शकतो. परंतु ज्या वेळेत आणि ज्या स्थितीत ही भेट झाली त्यामुळे या भेटीचे अनेक अर्थ लावले जातात.

स्वाभाविक आहे की या भेटीवर अनेक चर्चा झाल्यावर शरद पवार किंवा राष्ट्रवादीकडून, 'ही नियमीत भेट होती, यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली किंवा पंतप्रधानांना सल्ला द्यायला पवार गेले होते' अशा पद्धतीचे स्पष्टीकरण देऊन एक नेहमीचं वाक्य बोललं जाईल. 'महाराष्ट्रातलं सरकार स्थिर आहे, त्याला कोणताही धोका नाही आणि ते पाच वर्ष टिकणार आहे.' शरद पवार  कोणत्या विषयावर चर्चा करण्यासाठी मोदींना भेटले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सहकार, बँकींग अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट झाली असं तर्क लावणा-यांनी सांगितलं. सहकार खातं अमित शहांकडे आल्यावर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावण्यात आले होते. महाराष्ट्रातल्या सहकाराला आता ब्रेक लागेल, सहकारातल्या भ्रष्टाचाराला आता ब्रेक लागेल असं म्हटलं जात होतं. त्यासंदर्भात किंवा बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बाेलण्यासाठी त्यांची भेट झाली असावी असंही म्हटलं जात होतं.

पण महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती मध्ये होणारे बदल पाहिले, की पवारांची भेट "पळा पळा! कोण पुढे पळे तो" या स्वरुपाची वाटते आहे. बदल असा की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बदल अपरिहार्य आहे. याला कोणी गोदी मिडिया, भक्त, मोदी समर्थक असं काहीही म्हणो. परंतु महाविकास आघाडीमध्ये एक अस्वस्थता आहे आणि ती सराकर भंग होण्याच्या दिशेने जाते आहे, हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसालाही कळते आहे. काँग्रेस आपले विचार नाना पटोलेंच्या मुखातून बोलतं आहे आणि काँग्रेसने कोणतंही सरकार पाडण्याची भाषा जाहीरपणे केलेली नाही. सुरुवातीला काँग्रेसमधली विचारवंत मंडळी बोलू लागतात, मग नेते मंडळी बोलतात आणि त्यानंतर काँग्रेसचं "हायकमांड" निर्णय घेतं मात्र बोलत नाही. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. काँग्रेसची वातावरण निर्मीती करुन निर्णय घेण्याची परंपरा आहे त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये काँग्रेस खुश आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेस आपलं दबावतंत्र वापरुन सराकरच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतील अधिकाधिक लाभाचा वाटा घेऊन टाकतं आहे. शिवसेनेच्या वाट्याला मात्र काहीच आलेलं नाही. उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने आजवर आदेश देण्याची सवय आहे, आदेश घेण्याची सवय नाही. तसंच त्यांना दबाव टाकण्याची सवय आहे, दबाव घेण्याची सवय नाही. एखाद्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून दबाव टाकला जातो आणि अनेकदा उद्धव ठाकरेंना आपलाच निर्णय बदलावा लागतो. निर्णयांच्या बाबतीत किती वेळा बदल झालेत हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांचा विषय असेल किंवा अन्य अनेक निर्णयांत उद्धव ठाकरेंनी आपली ताकद वापरली आहे. त्यावरुन अशी धरसोड वृत्ती कामाची नाही अशी टिका शरद पवारांनीही केली आहे. शिवसेनेतली अस्वस्थता, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असणं या गोष्टी उद्धव ठाकरेंना सहन होणा-या नाहीत. दोन वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतर या पदाचे फायदे तोटे मुख्यमंत्र्यांना कळु लागले आहेत. सोबत राहून जितका लाभ मिळवता आला होता तितका सत्तेत राहून मिळवता आला नाही म्हणुनच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचीही वाटचाल एकमेकांकडे चालली आहे.

भाजप आणि शिवसेना राज्याच्या राजकारणात कधीही एकत्र येऊ शकतात परंतु असं घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी मात्र ही धोक्याची घंटा असणार आहे. असं कधीही घडू शकतं हे पाहण्याची चाणाक्ष बुद्धि शरद पवारांकडे आहे म्हणुनच ते वारंवार अशी कृती करतात ज्याने सरकारवर दबाव निर्माण होईल. कदाचित पंतप्रधानांची भेट घेऊन पवारांनी हेच दबावतंत्र अवलंबलं असेल. हे पहिल्यांदाच घडलं असं नाही. यापूर्वीही शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांसोबत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यावरुन ब-याच चर्चा झाल्या होत्या. राष्ट्रवादीला अशी भेट घडलीच नसल्याचा खुलासा करावा लागला होता. जेव्हा एखाद्या सरकारला वारंवार "आमचं सरकार टिकणारच" असा खुलासा करावा लागतो तेव्हा ते सरकार अडचणीत असतं हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पवारांनी घेतलेली भेट ही सरकारच्या प्रमुखावर दबाव वाढवण्यासाठीची होती. शरद पवारांना हे सरकार चालू द्यायचं आहे का असा प्रश्न पु्न्हा एकदा निर्माण होतो आहे.

पवारांना हे सरकार चालू द्यायचं असतं तर त्यांच्या भूमिकेवर ते ठाम राहिले असते आणि उद्धव ठाकरेंच्या मागे आपली शक्ति उभी केली असती. परंतु उद्धव ठारेंच्या कामावर कधी स्तुती तर कधी नाराजी व्यक्त करत ते अस्वस्थ होतील अशी कृती पवार वारंवार करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे अस्वस्थ व्हावेत आणि त्यांनी बाहेर पडावं हा पवारांचा हेतू आहे का? किंवा त्यापूर्वीच आपण भाजपसोबत जुळवून घ्यावं असं पवारांना वाटतं आहे का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रशांत किशोर आणि पवारांची वारंवार भेट होते आहे, ते जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या एकत्रिकरणात शंभर आमदारांच सुद्धा एकत्रिकरण करता आलेलं नव्हतं, पवारांना आपल्या मर्यादांची जणीव झाली आहे. त्यांचे जितके खासदार भाजपमध्ये आहेत त्यापेक्षाही जास्त मंत्री भाजपचे आहेत. ही सगळी स्थिती पहाता, पवार दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत की मोदींशी जवळीक साधण्याचा हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र या सगळ्यात ठाकरे सरकार अजूनही धोक्यात आहे ही त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळेच कदाचित अध्यक्षांची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा घाट घातला जात आहे. काँग्रेसचा भरवसा नाही, शरद पवारांवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. अशा स्थितीतला वाढता दबाव उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यास भाग पाडणारा ठरु नये. आता पवार मोदींना का भेटले हे येणा-या काळातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.