विजय कुलकर्णी परभणी : जिंतूर - जालना महामार्गावरील जोगवाडा पाटीजवळ शुक्रवार सकाळी ७:३० च्या सुमारास धावत्या खासगी ट्रॅव्हल्सने पेट घेतला. या घटनेत ट्रॅव्हल्स पूर्णतः जळुन खाक झाली आहे. पुण्याहून हिंगोलीकडे एक खासगी ट्रॅव्हल्स शुक्रवारी सकाळी ७:३० च्या सुमारास जिंतुर मार्गे जात होती. जोगवाडा पाटीजवळ ट्रॅव्हल्स आली असताना तेथे अचानक ट्रॅव्हल्सने पेट घेतला. धावत्या बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. बसने पेट घेतल्यानंतर आतील प्रवाशांना तात्काळ उतरवण्यात आले.
घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना देण्यात आली. पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बळवंत जमादार हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी व पोलिसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या बसमध्ये १२ प्रवाशी प्रवास करत होते. कुणालाही काही दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सपोनि बळवंत जमादार यांनी दिली. आगीचे नेमके कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही.