संपर्क तपासणी 16 पथकांची स्थापना

1 min read

संपर्क तपासणी 16 पथकांची स्थापना

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: हिंगोली शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. या करिता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 16 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकात नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज रविवारी प्रशिक्षण देण्यात आले.

हिंगोली शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या जशी समोर येत आहे तसे रुग्ण दगावण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. ही साखळी तोडण्या करीता संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण करणे गरजेचे झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहराकरिता 16 पथकांची स्थापना केली आहे. यातील प्रत्येक पथकामध्ये एक आशा वर्कर, एक तलाठी व दोन शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या उपक्रमाकरिता जिल्हा परिषदेचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत आज रविवारी पथकातील कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेच्या कल्याण मंडप सभागृहांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. येणाऱ्या काळात ही पथके शहरात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करतील. विशेष बाब म्हणजे पोलीस विभागाने सदर पथकांत सोबत आपला बंदोबस्त देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून संबंधित प्रभागातील नगरसेवकांनी या पथकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.