सत्तेचं सहज हस्तांतरण करणारी सुष'मा'..!!

1 min read

सत्तेचं सहज हस्तांतरण करणारी सुष'मा'..!!

संघर्ष करुन स्वकष्ट, प्रचंड अभ्यासू आणि चिंतनशील वृत्तीने व विविध भाषांवर असलेल्या प्रभुत्वाने सुषमा स्वराज भारतीय राजकारणात अढळ स्थान निर्माण करुन गेल्या.,

भारताच्या राष्ट्रीय राजकारणात पुरुषांच्या तुलनेत स्त्री नेतृत्त्व फारसं मोठं झालं नाही. त्याला अपवाद दक्षिणेत जयललिता, उत्तर प्रदेशात मायावती, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर दिल्लीत सुषमा स्वराज राहिल्या.
दक्षिणेच्या जहाल राजकारणात एम.जी. रामचंद्र यांनी निर्माण केलेली जागा. त्यांच्या नंतर कधी करुणानिधी तर कधी जयललिता यांच्याकडे राहिली पण अशा राजकारणात स्त्री असूनही जयललिता यांनी अनेकांना टक्कर देऊन ते स्थान स्वबळावर कमावलं तसंच काही उत्तरप्रदेशात होतं, काशिराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मृत्युनंतर मायावती यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
ममता कॉग्रेस फोडून आणि डाव्यांना अंगावर घेत त्यांची तीन दशकांची सत्ता उध्वस्त करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचल्या होत्या, पण या तीनही महिलांना काही ना काही बॅकअप होतं, पक्ष नेता आणि साधनसुचिता होती म्हणून त्यांना राजकारण सोपं गेलं त्या तुलनेत सुषमा स्वराज यांचा मार्ग खडतर होता..

कसलीही राजकीय अथवा इतर पार्श्वभूमी नसताना देखील आणिबाणीच्या काळात आंदोलनात सहभागी होऊन, जयप्रकाश नारायण यांच्या विचारधारेला अग्रस्थानी मानून,प्रसंगी लाठ्या खाऊन, संघर्ष करुन स्वकष्ट, प्रचंड अभ्यासू आणि चिंतनशील वृत्तीने व विविध भाषांवर असलेल्या प्रभुत्वाने सुषमा स्वराज भारतीय राजकारणात अढळ स्थान निर्माण करुन गेल्या.

ज्या वयात चार मित्र मैत्रिणी घेऊन भटकायचं, बेफ़ामपणे वागायचं असतं त्या वयात अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सुषमाजी कॅबिनेट मंत्री होत्या. विद्यार्थी चळवळीतील एक बुलंद आवाज म्हणून त्या उदयास आल्या.

देशाच्या राजकारणात सासू, सासरे, पती, आई, वडील यांच्या पुण्याईवर नेतृत्व केलेल्या आणि करत असलेल्या अनेक महिला झाल्या, होतील पण सुषमा स्वराज यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

अवघ्या पंचवीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्री झालेल्या सुषमाजी नंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आणि पुढे देशाच्या विदेशमंत्री देखील झाल्या.
जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या भारतीयाला जर काही अडचण आली तर एका ट्वीटवर त्याला सर्वतोपरी मदत केली जायची, ही किमया त्यांनी स्वत: विदेशमंत्री असताना करुन दाखवली होती.

राजकारणात पर्मनंट असं काही नसतं, जशी वेळ बदलते तसं नेतृत्वही बदलतं. नवा गडी नवं राज्य हे वास्तव स्विकारून चाललं पाहिजे. सुषमाजींनी ते स्विकारलं होतं.
भारतीय जनता पक्षात नव्या नेतृत्वाच्या उदयामुळे आडवाणी गट अस्ताकडे जात होता. हे त्यांना समजलं होतं म्हणून त्यांनी वेळेआधी स्वत:हून बाहेर पडायचं ठरवलं. यशाचे डोंगर सर करत असताना थांबायचं कुठे हे ज्याला कळलं तोच शहाणा असतो.
अटलजींची निवृत्ती आणि आडवाणींच्या नेतृत्वाला ग्राउंड लेवलवर होत असलेला छुपा संघर्ष या दरम्यान सुषमा स्वराज यांच्याकडे पक्षांतर्गत एक प्रमुख भूमिका आली होती. जी त्यांनी आक्रमकतेने सांभाळली.
एक आई घर उभं करते मुलं मोठी करते आणि ती कर्ती सवरती झाली की मग सगळी जबाबदारी निर्मोही होऊन मुलांवर सोपवते भाजपात असेच वागल्या सुषमाजी.

हे बाजूला होणे सोपं नसतं आणि
नेमकं हेच सुषमाजींनी हेरलं, त्या थांबल्या, पण थांबल्या ते कायमच्या.

गेल्या अनेक दशकापासून कलम ३७० पासून काश्मिरची सुटका करणं हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यातील मुख्य उद्दिष्ट होतं.
मे २०१९ ला पुन्हा निवडून आलेल्या भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केलं, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान आणि संघ-भाजपच्या अनेक नेत्यांच्या संकल्पाची पुर्ती झाली होती.
अशा या ऐतिहासिक गोष्टीचा आनंद सोबत घेऊनच सुष्माजींनी दुस-याच दिवशी स्वर्गारोहण केलं.

दिनांक ६ ऑगस्ट २०१९ च्या संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांच निधन झालं.
विद्यार्थी दशेपासून देशहितासाठी "कार्यारंभ" केलेल्या या "दुर्गा" अवताराचा अंत झाला.
संस्कृत, हिंदी, आणि इंग्रजी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या माँ सरस्वतीच्या रुपाचं या "वाग्देवी"च स्वर्गाच्या दिशेनं प्रस्थान झालं.

तीन पेक्षा अधिक दशके देशाच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणा-या, स्वकष्टावर ग्राउंडलेवल ते केंद्रीय मंत्री व्हाया मुख्यमंत्री असा धुवाधार प्रवास करणा-या आणि देशाला न लाभलेल्या सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक नेत्या पद्मविभुषण स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांना विनम्र अभिवादन..!!

छोड हमें वो चली गयी कुछ पल की मोह संगीनी माया.!!