२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार

1 min read

२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार

दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते.

मुंबई: दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ प्रस्ताव आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्याबाबत नियमावली, सूचनाही अद्याप जाहीर झाल्या नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. याचं उत्तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली होती.

दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू ठेवले आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

दरम्यान, माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे दिवस 230 दिवस होणे आवश्यक होईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 200 व इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 220 होणे आवश्यक आहे, असंही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.