उच्चपदस्थ अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जि. प.चे निर्जंतुकीकरण

1 min read

उच्चपदस्थ अधिकारी कोरोना बाधित निघाल्याने जि. प.चे निर्जंतुकीकरण

बुधवारपर्यंत कार्यालय राहणार बंद

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली : जिल्हा परिषदेतील एक उच्चपदस्थ अधिकारी कोरोना  बाधित झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज सोमवारी संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर बुधवारपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रविवारी जिल्हा परिषदेतील एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर खळबळ उडाली. सदर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांना विलगीकरण  करण्यात आले आहे. त्याचबरोबर आज सोमवारी जिल्हा परिषद कार्यालय बंद करण्यात आले. तसेच कार्यालयाच्या आतील सर्व  विभाग व पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता बुधवार दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत जिल्हा परिषद कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.