शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणा-या लोणीकरांवर गुन्हा.

1 min read

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणा-या लोणीकरांवर गुन्हा.

परभणी जिल्हाधिकाऱ्यांची हुकूमशाही आमदार लोणीकर यांच्यासह परभणीच्या आमदार खासदारांवर गुन्हे दाखल. विधानसभेत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचा पर्दाफाश करू - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

परभणी: कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे यायचं नाही आम्हाला काही सांगायचं नाही कोणत्याही प्रकारची सूचना करायची नाही. अशी इच्छा असणाऱ्या परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरात हुकूमशाही सुरू केली असून लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची मजल गेली आहे. सोशल डिस्टंसिंग चे पालन केले नाही या नावाखाली माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह स्थानिक आमदार खासदार यांच्यावर आणि सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांवर भादंवि कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी हे लोकसेवक आहेत की हुकुमशहा असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. हुकूमशाही करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभेत पर्दाफाश करू असे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे मोजक्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेऊन सोशल डिस्टंसिंग चे पालन करत जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भेटण्यासाठी गेले होते. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील 13 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे उगवले नाही त्यामुळे हायकोर्टाने आदेशित केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ व खासगी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी लोणीकर यांनी केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांची बैठक घेऊन तात्काळ कर्ज वाटप करण्याबाबत सूचना करायला हवी अशी मागणी देखील या भेटीमध्ये लोणीकर यांनी केली होती. परभणी जिल्ह्यामध्ये बँक कर्ज वाटप करत नाहीत आणि ज्या ठिकाणी वाटप केले आहे त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा प्रकारच्या तक्रारी लोणीकर यांच्याकडे शेतकरी करत होते. त्यानुसार लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती परभणी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन च्या नावाखाली जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन यांचा मनमानी कारभार सुरू होता. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन बाबत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे त्या भागाला कंटेनमेंट झोन बनवावे संपूर्ण जिल्ह्याला त्यासाठी वेठीस धरू नये अशी सूचना लोकप्रतिनिधी म्हणून लोणीकर यांनी केली होती. त्याचप्रमाणे गंगाखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमात पाच हजार पेक्षा अधिक लोक एकत्रित आले होते. त्याची परवानगी कुणी दिली व दिलेली परवानगी नियमानुसार होती का नसेल तर त्या ठिकाणी उपस्थित महसूल विभागाचे कर्मचारी पोलिस विभागाचे कर्मचारी कृषी विभागाचे कर्मचारी आणि इतर ज्या विभागाचे कर्मचारी असतील त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लोणीकर यांनी केली होती. लोकांच्या भावना जिल्हाधिकां-या पर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जायचे नाही काय असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पालकमंत्र्यांना वेगळा न्याय का?
परभणी येथे पालकमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये शंभरपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते स्वतः पालकमंत्र्यांनी देखील मास्क लावलेला नव्हता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतली मग त्यांच्यावर देखील सोशल डिस्टंसिंग च्या नियमा अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह तर अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करायला हवा होता. परंतु जिल्हाधिकारी पक्षपाती वागणूक देत असून सोयाबीन बियाणे कंपन्यांचा मुद्दा उचलून धरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाचे काहीतरी "नुकसान" झाले असावे म्हणून की काय लोणीकरांसह जनतेच्या सुचना घेऊन जाणाऱ्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील खासदार संजय (बंडू) जाधव व त्यांचे सहकारी या सर्वांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झालेल्या कार्यक्रमात पाच हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित होते त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे का? दाखल करण्यात आले नाहीत? असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.