श्री स्मरण...!

मधुबाला, मीनाकुमारी, वहीदा, वैजयंती, जया, राखी, रेखा, विद्या किंवा माधुरी, मंदाकिनी, किमी यांच्यासारखं स्पेशल असं काहीही मटेरियल नसतानाही श्री ह्या सर्व अभिनेत्र्यांपेक्षाही अधिक यशस्वी ठरली. सगळ्यांच्या गुणवैशिष्टयातला थोडा थोडा अंश 'श्री'मध्ये आला म्हणूनच ती अधिक यशस्वी झालीही असेल

श्री स्मरण...!

नसेल 'ती' वहिदा रहेमान - वैजयंती मालासारखी नृत्यबिजली. नसेल 'ती' मधुबाला-माधुरी इतकी नितांत सुंदर अप्सरा. जमत नसेल 'ती'ला रेखा - राखी गुलजार सारखी अस्खलित हिंदी राष्ट्रभाषा. जमले नाही 'ती'ला मंदाकिनी - किमी काटकर सारखे अगदी बिनधास्त एक्सपोज होणे, किंवा जया भादुरी - विद्या सिन्हासारखी कुलीन अन घरंदाज कधी दिसलीही नसेल. पण श्रीदेवी उर्फ 'श्री'नं आपल्यातल्या सर्व उणीवांवर मात करून बॉलिवुडमध्ये पहिली लेडी सुपरस्टार पद पटकावलं होतं आणि टिकवूनही ठेवले. तेही अनेक वर्षे... हरहुन्नरी, सर्वगुणसम्पन्न अभिनेत्री 'श्री' वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी रसिक चाहत्यांना सोडून गेली हा मोठाच 'सदमा'च. 'श्री'च्या जाण्याला आज दोन वर्षे झाली. भलेही अनेक वर्षापासून 'श्री' अभिनयापासून दूर असली तरी तिच्या अकाली जाण्याने बॉलीवुडमध्ये कधी भरून येणार नाही, अशी पोकळी निर्माण झाली आहे. कोट्यावधी रसिकांना आपल्या अविस्मरणीय अभिनय व नृत्यकौशल्याने खिळवून ठेवणारी 'श्री' रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. आज पुन्हा 'श्री' स्मरणानिमित्त...!

मधुबाला, मीनाकुमारी, वहीदा, वैजयंती, जया, राखी, रेखा, विद्या किंवा माधुरी, मंदाकिनी, किमी यांच्यासारखं स्पेशल असं काहीही मटेरियल नसतानाही श्री ह्या सर्व अभिनेत्र्यांपेक्षाही अधिक यशस्वी ठरली. सगळ्यांच्या गुणवैशिष्टयातला थोडा थोडा अंश 'श्री'मध्ये आला म्हणूनच ती अधिक यशस्वी झालीही असेल, असं म्हणता येईल.

'श्री' म्हणजे एक सौन्दर्यवती, निपुण नृत्यांगणा, अवखळ, पण गुणी आणि हिन्दीतली 'पहिली सुपरस्टार अभिनेत्री'. दाक्षिणात्य निर्मात्यांच्या चित्रपटात 'श्री'च्या बहुतेक भूमिका अवखळ, नखरेल, चालू आयटेम, बरिचशी उच्छ्रंखल असे. 'श्री'ची भूमिका जर रईसी थाटमाठाची असेल तर तिचं नकटं नाक तिचा रुबाब व उर्मटपणा आणखी ठसकेबाज असे. या उलट हिंदी निर्मात्यांच्या चित्रपटात 'श्री' अभिनय जगली. तिचे अभिनयगुण यश चोप्रा, सुभाष घई, के. विश्वनाथ, बोनी कपूर, हरमेश मल्होत्रा सारख्या दिग्दर्शकानी हेरले. नसता दाक्षिणात्य चित्रपटात 'श्री' अक्षरशः वायाच गेली असती, असं किमान माझं तरी ठाम मत आहे.

चित्रपटप्रेमींना 'श्री' खरं तर बालकलाकार म्हणून कधीच परिचित नव्हती. दाक्षिणात्य चित्रपटात बालकलाकार म्हणून तिने पन्नासपेक्षा अधिक भूमिका साकारल्या असल्या तरी १९८३ च्या सुरुवातीला बॉलिवुडमध्ये श्रीदेवी नावाचा 'मेड इन शिवाकाशी' बॉम्ब 'हिम्मतवाला'ने दणक्यात वाजला. त्यापूर्वी 'शिवाकाशी' फक्त लवंगी फटाकडयापासून सर्व प्रकारच्या बारूदी बॉम्बसाठी ओळखले जायचे. 'पद्मालया'ची निर्मिती 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीची ओळख झाली. ही कोण नवी छोकरी? असा प्रश्न पडला तेव्हा आठवलं की, 'ज्यूली'मध्ये लक्ष्मीच्या लहान बहिणीच्या भूमिकेत 'श्री' झळकली होती. त्यात तिचे खुलू पाहणारे तारुण्य नजरेत भरणारे होते. पण लक्ष्मी अधिक मादक होती. म्हणून 'श्री'कडे बहुतेक लक्ष गेले नाही. पण मस्तवाल सरपंच शेरसिंग बन्दूकवाला आणि त्याची तितकीच मस्तवाल, उर्मट, गर्विष्ठ पोरगी रेखा (श्रीदेवी) पाहताक्षणी नजरेत भरली. शहरात शिकून गावात आलेली रेखा मस्तवाल बापाच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरीब गावकऱ्यांना कमालीचे छळू लागते. तिचा माज उतरवणारा 'हिम्मतवाला' इंजिनीअर रवि (जितेंद्र) बनून येतो. आधी उडतो संघर्षाचा भडका आणि नंतर नायक-नायिकेची प्रेमकथा. 'हिम्मतवाला' एक साधारण कथानक असलेला निव्वळ गल्लाभरु चित्रपट. जितेंद्र आणि श्रीदेवीची झकास जोडी, कादर खान, अमजद खान व शक्ती कपूरची भन्नाट कॉमेडी, इंदिवर यांची उडत्या चालीना भप्पी लाहिरी यांचे संगीत आणि नयनरम्य लोकेशन्स म्हणजे यशाचा ठासून भरलेला मसाला. तिकीटबारीवर 'हिम्मतवाला' जबरदस्त यशस्वी ठरला. लहान मुलांपासून वृद्धापर्यन्त सर्वांच्या तोंडात 'नैनो में सपना...'सह सर्व गाणी खेळु लागली. सिबाका गीतमाला, रेडियो सिलोन, विविध भारती सगळीकडे 'हिम्मतवाला'ची गाणी गाजत होती. या चित्रपटाने 'श्री'ला अफाट यश दिले. दीडशे कोटी गुंतवलेल्या सिनेमाने तीनशे कोटी कमावल्याचा आनंद साजरा करण्याच्या जमान्यातल्या रसिकाना 'हिम्मतवाला'चं यश मोजता येणार नाही. कारण 'श्री'च्या हिम्मतवालाने गुंतवणुकीच्या दुप्पट-तिप्पट नव्हे, चक्क पंधरा पटीपेक्षा अधिक गल्ला जमवला होता.

याच वर्षी जितेंद्रसोबत जानी दोस्त, जस्टीस चौधरी, मवाली हेही चित्रपट यशस्वी झाले, तर सदमा आणि कलाकार हे दोन फ्लॉप गेले. श्रीदेवीच्या प्रतिमेला साजेशी भूमिका 'कलाकार'मध्ये होती, मात्र मनोजकुमारचा चिरंजीव कुणाल गोस्वामीचा मठ्ठपणा चाहत्याना पचला नाही. नाही म्हणायला 'कलाकार' आजही लक्षात आहे तो 'नीले नीले अंबर पे चांद जब छा जाएं...' या गाण्यामुळे. पण संवेदनशील अभिनेता कमलहासन, बालू महेंद्रासारख्या सर्जनशील दिग्दर्शकाचा परिसस्पर्श, इलैयाराजाचे कर्णमधूर संगीत आणि गुलजार यांच्या सुरेल रचनांचा समावेश, शिवाय मादक सौन्दर्याचा आणखी एक एटमबॉम्ब सिल्क स्मिताचा आकर्षक डान्स आयटम असूनही 'सदमा' का कोसळला? ते अजूनही कळत नाही. 'श्री'चं हे वेगळे रुप चाहत्यांना आवडले नाही. त्या अपयशानंतर तिनेही वेगळे प्रयोग केले नाहीत, हे आवर्जून लक्षात येते. ( अपवाद निर्माता -दिग्दर्शक यश चोप्रा यांचा लम्हे. तसा व्यावसायीकदृष्टया 'लम्हे' हाही अपयशीच. पण आजही तो लक्षात राहतो तो 'श्री'चा सहजसुंदर अभिनय, शिव-हरी यांचं संगीत, मनोहारी नृत्य सादरीकरण, राजस्थानी लोकेशन्सकरीता. विशेषतः बिन मिशीचा अनिल कपूर भारी गोंडस अन तितकाच निरागस दिसला. त्याच्यासाठी हा एक वेगळा प्रयोग होता. श्रीदेवीच नव्हे, तर यश चोप्रा यांच्याही कारकीर्दीतली सर्वाधिक क्लासिक कलाकृती म्हणजे 'लम्हे'. अपयशी ठरला तरी आजही 'श्री'च्या अभिनयासाठी सलाम ठोकायलाच हवा. )

बहुतेक ज्या चित्रपटात 'श्री'ने चालू टाइपच्या भूमिका निभावल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या दाक्षिणात्य निर्मात्यांच्या होत्या. सरफरोश, मास्टरजी, इंकलाब, अकलमंद, मकसद, तोहफा, नया कदम, बलिदान, औलाद, धर्मअधिकारी, घरसंसार, सुहागन, मजाल, वतन के रखवाले, सोने पे सुहागा, गैरकानूनी इत्यादी इत्यादी. दाक्षिणात्य निर्मात्यांनी श्रीदेवीच्या इमेजनुसार भूमिका निर्माण केल्या. तशा भूमिका लिहिल्या जाताना रसिकांच्या डोक्याला कसलाही ताण न देता दोन घटका शुद्ध करमणूक आणि पैसे वसूल झाले पाहिजेत, गल्ला भरला पाहिजे, या हेतुने श्रीदेवीला वापरले. त्यातल्या त्यात दाक्षिणात्यांची निर्मिती असलेल्या आखरी रास्ता, हिम्मत और मेहनत, तोहफा, औलाद अशा काही मोजक्या चित्रपटामध्ये तिचा अभिनय दिसून आला.

दाक्षिणात्य निर्माता-दिग्दर्शकाच्या तुलनेत बॉलीवुडच्या दिग्दर्शकांनी 'श्री'कडून अतिशय छान अभिनय करवून घेतला. यात प्रामुख्याने कर्मा ( सुभाष घई ), खुदा गवाह ( मुकुल आनंद ), जाग उठा इन्सान ( के. विश्वनाथ ), जाँबाज ( फिरोज खान ), मि. इंडिया, रूप की रानी चोरों का राजा, जुदाई ( बोनी कपूर ), नगीना, निगाहें, बंजारन ( हरमेश मल्होत्रा ) आदी चित्रपटांचा समावेश करता येईल. आपल्यापेक्षा वयाने खुप मोठ्या अमिताभ, रजनीकांत, जितेंद्र, समवयीन गोविंदा, कुणाल गोस्वामी सोबत 'श्री'चे ट्यूनिंग छान जमले. 'श्री'चा 'चालबाज' हा हेमा मालिनीच्या 'सीता और गीता'ची भ्रष्ट नक्कल. परन्तु अभिनयात श्रीदेवी सनी आणि रजनीकांत यांना वरचढ ठरली. पण हेमाची सर आली नाही. बोनी कपूरच्या 'मि. इंडिया' आणि 'जुदाई' या दोन्ही चित्रपटात ती अधिक खुलली. 'खुदा गवाह'मध्ये घोड्यावर बसून अमिताभ सोबतीने बुश्काशी खेळातला थरार मस्तच जमून आला. खेळ ऐन भरात असताना पर्दानशी 'श्री'च्या चेहऱ्यावरुन कपड़ा घसरतो, आणि ती बेपर्दा होत जाते, तेव्हा तिच्या सौन्दर्याने अमिताभसोबत पब्लिकही घायाळ झाली. त्यावेळी तिची अदा भन्नाट आहे. घई यांच्या 'कर्मा'मध्ये डॉ. डैंगच्या फर्माइशीवर 'ए मोहब्बत तेरी दास्तां के लिये...' हे आणि यशजींच्या 'लम्हे'तले 'मोरनी बागां मा बोले आधी रात मा...' तसंच 'चांदनी'मधले 'मेरे हाथों में नौ नौ चूड़ियाँ...' ही गाणी 'श्री'च्या कारकीर्दीत माइलस्टोन ठरावित. 'नगीना'त 'मैं तेरी दुश्मन ...' या गाण्यावरही तिने धमाल नृत्य केले. हा चित्रपट अनेक शहरात सिल्व्हर जुबिली हिट ठरला. पण व्यावसायीकदृष्टया अपयशी ठरूनही फिरोज खान यांच्या 'जाँबाज'मधल्या 'हर किसी को नही मिलता यहाँ प्यार जिंदगी में...'मधली नजाकत काळजाला भोक पाडते.

हिंदीत येण्यापूर्वी श्रीदेवीने तामिळ, मल्याळम, तेलगु आणि कानड़ीत मोठे यश मिळवळे. पण हिंदी चित्रपटानी तिला अभिनेत्री म्हणून ओळख दिली. कुठलाही चित्रपट, ज्यात श्रीदेवी प्रमुख भूमिकेत असली की, नायक कोणीही असो. कादर खान, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, असरानी, अरुणा ईरानी, मनमौजी, बिरबल यांचा धींगाणा मस्त जमून यायचा. दाक्षिणात्य निर्मात्यांची निर्मिती ही फक्त 'एंटरटेनमेंट... एंटरटेनमेंट... अँड एंटरटेनमेंट....' याची पूर्ण हमी असे. डोक्याला कसलाही शॉट नसल्याने अशा चित्रपटावर पब्लिक तुटून पडत असे. एका पाठोपाठ एक सिल्व्हर ज्यूबिली चित्रपट देणारी श्रीदेवीसारखी अभिनेत्री हेमा मालिनी, रेखा, जया प्रदा, मिनाक्षी शेषाद्री, माधवी, रिना रॉय, पद्मिनी कोल्हापुरे, अनिता राज तसेच 'सेक्स बॉम्ब' मंदाकिनी, किमी काटकरसारख्या समवयीन आणि परवीन, झीनत या ज्येष्ठ अभिनेत्रीमध्ये वरच्या स्थानावर विराजमान झाली. बॉलीवुडमधली पहिली लेडी सुपरस्टार म्हणून 'श्री'ची गणना केली गेली. अनेक निर्माता-दिग्दर्शकानी 'श्री'च्या तारखा मिळत नाहीत म्हणून दक्षिणेतून भानुप्रिया ( दोस्ती दुश्मनी ) राधा ( कामयाब ), राधिका ( कुदरत का कानून ), शांतिप्रिया ( सौगंध ) तसेच श्रीलता, श्रीप्रदासारख्या 'श्रीदेवी'च्या डुप्लीकेटसना पडद्यावर आणले. यातली एकही अभिनेत्री प्रभाव पाडु शकली नाही. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जशा आल्या तशा परतल्या. मात्र 'श्री'चं नम्बर वन स्थान कोणालाही काबीज करता आले नाही. वाढत्या वयात श्रीदेवीने 'जुदाई'नन्तर अभिनयापासून बिदाई घेतली आणि तब्बल १५ वर्षानी 'इंग्लिश विंग्लिश'द्वारे पुनरागमन केले. चेहऱ्यावर वय स्पष्ट दिसत होते. तरी सिनेरसिकाना 'श्री' आवडली, त्याहीपेक्षा 'मॉम' प्रभावी होता. तोच 'श्री'चा कारकीर्दीतला अखेरचा चित्रपट ठरला.

उणेपूरे ५४ वय वर्ष म्हणजे मृत्यु येण्याचे वय नाही. पण काळाने एका गुणी अभिनेत्रीला अकाली ओढून नेले. कुशल नृत्यांगणा, अवखळ सौन्दर्यवती, एक ताकदीची व समर्थ अभिनेत्री म्हणून 'श्री' सदैव सिनेरसिकांच्या हृदयात व स्मरणात राहील...!

  • विजयकुमार स्वामी, लातूर

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.