सुमित दंडुके/औरंगाबाद : लॉकडाऊन हा कुणाच्याही आवडीचा विषय नाही. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकार पुढे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. जेणेकरून रुग्ण संख्या आटोक्यात राहील व लाॅकडाऊनची वेळ येणार नाही असे औरंगाबादचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी लॉकडाऊनविषयी सूचक वक्तव्य केले.
राज्यात आणि शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जर ही संख्या आटोक्यात आली नाही तर लॉकडाऊन शिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकार समोर उरणार नाही. लॉकडाऊन कुणाच्याही आवडीचे नाही मात्र रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी हा एकमेव पर्याय असेल. त्यामुळे नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये'.
तसेच जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची माहिती घेत यंत्रणांना सर्तक राहण्याचे निर्देशित करत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर, गर्दी टाळणे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावीरित्या उपाययोजना करण्याचे सूचित केले. जेणेकरुन वेळीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य होईल. अन्यथा संसर्ग रोखणे आवाक्याबाहेर जाईल. त्यामुळे ‘मी जबाबदार’ याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने रात्रीची संचार बंदीची वेळ गरजेनुसार वाढवण्याबाबत तसेच लग्न, कार्यक्रम, समारंभ येथे पाहणी पथकाने गर्दीवर नियंत्रण, मास्क वापराची पाहणी करावी, तसेच आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करुन जनतेकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कटाक्षाने पालन करुन घ्यावे. असे पालकमंत्र्यांनी सुचीत केले आहे.