...तर भाजपला निवडणूक लढवावी की नाही, याचा विचार करावा लागेल - धनंजय मुंडे

1 min read

...तर भाजपला निवडणूक लढवावी की नाही, याचा विचार करावा लागेल - धनंजय मुंडे

सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. पदवीधर मतदारांनी चव्हाण यांना विजयी करावे, जेणेकरून या मतदार संघातून भाजपाला निवडणूक लढवावी की नाही, असा विचार करावा लागेल. - धनंजय मुंडे


परभणी प्रतिनिधी/विजय कुलकर्णी : महाविकास आघाडी ‘सबका साथ, सबका विकास’ हे घोष वाक्य घेऊन ही निवडणुक लढवत आहे. सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. पदवीधर मतदारांनी चव्हाण यांना विजयी करावे, जेणेकरून या मतदार संघातून भाजपाला निवडणूक लढवावी की नाही, असा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणीत केले.  यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश वरपुडकर होते. परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालयात शनिवार, २१ रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना धनंजय मुंडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा. संजय जाधव, खा. फौजिया खान, मा. खा. जयसिंगराव गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, तुकाराम रेंगे, सुरेश जाधव, आ. अमोल मिटकरी, आ. बाबाजानी दुर्राणी, विक्रम काळे, मा. आ. विजय भांबळे, ज्ञानोबा हरि गायकवाड, संतोष बोबडे, रामभाऊ घाडगे, पंजाबराव देशमुख, सारंगधर महाराज, प्रताप देशमुख, मधुसूदन केंद्रे, महापौर अनिता सोनकांबळे, नंदा राठोड, जयश्री खोबे, सखुबाई लटपटे, भावनाताई नखाते, प्रा. किरण सोनटक्के, बाळासाहेब जामकर, हरिभाऊ शेळके, अनिल नखाते, नदीम इनामदार, गुलमीर खान, डॉ. उल्हास  उडाण, प्रा. तुकाराम  साठे, अशोक काकडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक स्वराजसिंह परिहार यांनी केले. यावेळी खा.संजय जाधव, खा.फौजीया खान, आ. विक्रम काळे, आ.अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही भाषणात भाजपावर हल्ला चढविला. केवळ प्रचार आणि अपप्रचार करण्यासाठी भाजपा सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करत आहे. केवळ घोषणा केल्या जातात. कृती केली जात नाही. वेळोवेळी करण्यात येणारे अपमान सहन न झाल्यामुळे नाईलाजास्तव मला पक्ष सोडणे भाग पडले. आता भाजपाची उलटी गिणती सुरु झाली असुन विनाकारण केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत, असेही यावेळी गायकवाड म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी भाजपा या निवडणूकीत टिकणार नाही. चव्हाण हे मराठवाड्यातील अनेक प्रश्न तळमळीने सभागृहात मांडतात. आ. विक्रम काळे आणि सतीश चव्हाण या जोडगोळीने अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. असेही प्रतिपादन केले. सूत्रसंचालन रणजित काकडे यांनी केले.