परभणी : जिल्हा आणि परिसरातील,वीज टंचाई लक्षात घेऊन,राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत व धरण क्षेत्र यामधील जागेवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाला मंत्री महोदयांनी सकारत्मक प्रतिसाद दिल्याने लोअर दुधना प्रकल्प क्षेत्राची जागा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडून उर्जा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरित करण्याकरिता आदेश पारित करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महानिर्मिती कंपनीद्वारे या प्रकल्पाची तांत्रिक क्षमता तपासण्याचे काम येत्या आठवड्याभरापासुन सुरु होणार आहे. लोअर दुधना प्रकल्पावर सुमारे साठ मेगावॅट क्षमता असणारा हा प्रकल्प आहे. याची अंदाजे किंमत ४०० कोटी रुपये असून त्याद्वारे सुमारे २५० ते ३०० स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यातील धरण क्षेत्रामध्ये उभारला जाणारा हा पहिला प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील इतर धरण क्षेत्राची तांत्रिक योग्यता तपासून प्रकल्प उभारणी करण्यात येईल असेही राज्याच्या ऊर्जा विभागाकडुन समजते आहे. ऊर्जामंत्री व पाणीपुरवठामंत्री यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प नावारूपाला येणार असून टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहत, नवीन राष्ट्रीय महामार्ग, सेलू शहर भूमिगत गटार योजना, इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असल्याने लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती आहे. येणा-या नियामक मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात येणार असल्याचे समजते.