सोनपेठ मध्ये खानावळी,धाब्यांना बारचे स्वरुप

यावर कार्यवाही होणार का?

सोनपेठ मध्ये खानावळी,धाब्यांना  बारचे स्वरुप

सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ : शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या धाब्यांवर मागील अनेक महिन्यांपासून देशी विदेशी दारूची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या गंभीर बाबीकडे उत्पादन शुल्क विभागासह, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळेच खानावळीमधून दारूविक्री चालू असल्याचा आरोप ग्रामीण भागातून व्यक्त केला जात आहे.

परभणी जिल्ह्यात नव्याने पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना हे रुजू झाले. त्या दिवसापासून परभणी जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सोनपेठमध्ये स्थानिक पोलीस या अवैध व्यवसायच चालकांवर कारवाई करत नसल्याने पोलीस अधीक्षकांच्या मुख्य पथकासह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सोनपेठमध्ये तळ ठोकून अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. याने जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या माना उंचावलेल्या आहेत. मात्र या कारवाईत तालुक्यातील धाब्यांना सवलत देण्यात आली का? अशी चर्चाही दबक्या आवाजात चालू आहे.

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तालुक्यातील सर्वच परवानाधारक दारूची दुकाने व बिअर बार बंद करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने परवानगी देताच तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांबरोबरच आता धाब्यावर सुद्धा दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणूका चालू आहेत. शहरासह तालुक्यातील सर्व धाबे, खानावळींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवैद्य दारू विक्री करणाऱ्या धाबा चालकाकडून गुप्त ठिकाणी शेतामध्ये दारू लपवून ठेवल्या जाऊन ही दारू विक्री होत आहे. दारू पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला मागेल त्या कंपनीची देशी-विदेशी दारू तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. यातील काही धाबाचालक हे बाहेर गावावरून होलसेल दारु विक्रेत्यांकडून दारूची खरेदी करत असतात तर काही जण धाब्यावर जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी दारूची मागणी करताच नजीकच्या बियर बार वरुन तत्काळ दारु उपलब्ध करून देतो असे म्हणून जवळच्या शेतातून ही दारू आणून देत असतात. याप्रकरणी यापूर्वी सोनपेठ पोलिसांनी अनेक वेळा अशा प्रकारची अवैध दारू विक्री करणा-यावर कठोर कारवाया केलेल्या आहेत.

मात्र सध्या कारवाई केल्या जात नसल्याने सोनपेठ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या धाब्यांवर आजही बिनदिक्कतपणे विनापरवाना दारूची विक्री सुरू आहे. अवैध व्यवसाय करणारे एवढे बोकाळले आहेत ते प्रशासनातील कुठल्याच अधिकाऱ्यांना जुमानत नाही. यामुळे संबंधित प्रशासन अवैध दारू विक्री करणाऱ्यांसमोर हतबल झाले की? मेहरबान झाले? असा सवाल उपस्थित होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.