सोनू सूदचा संयुक्त राष्ट्र संघाकडून सन्मान, कठीण काळात माणुसकीचे दर्शन

1 min read

सोनू सूदचा संयुक्त राष्ट्र संघाकडून सन्मान, कठीण काळात माणुसकीचे दर्शन

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत करत सोनू सूदने माणुकीचे दर्शन घडवले.

मुंबई : बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवतांची वेळोवेळी मदत करत सोनू सूदने माणुसकीचे दर्शन घडवले. त्याच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजुर, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

इतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून, खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने शिष्यवृत्ती देखील जाहीर केली आहे.

सोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान (Award) माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून दाखल घेतली जाणे खूप विशेष आहे. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या देशवासीयांसाठी जे काही करता येईल ते केले. संयुक्त राष्ट्र संघाने याची दाखल घेणे आणि याचा सन्मान करणे ही विशेष बाब आहे. संयुक्त राष्ट्र संघ (UNDP) मानवतेच्या दृष्टीने आखत असलेल्या धोरणाला माझा नेहमीच पाठिंबा असेल. यामुळे पुढे जगाला फायदा होणार आहे’, असे सोनू सूदने म्हटले आहे.

सोनू सूदच्या आधी एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डाय कॅप्रिओ, एम्मा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँकेट, अँटोनियो बंडेरस, निकोल किडमॅन आणि प्रियंका चोप्रा यांच्यासारख्या कलाकारांना संयुक्त राष्ट्र संघाच्या या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) पार पडलेल्या एका व्हर्चुअल सन्मान सोहळ्या दरम्यान सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.