सोवळे असते तरी काय?

1 min read

सोवळे असते तरी काय?

कोरोनाच्या महामारीत सोवळे योग्य असे सांगत आपल्या अलिप्तता आणि श्रेष्ठतेच्या विचारांना लादू पाहणा-या मंडळीना हे वाचणे नक्कीच आवश्यक आहे. कारण सोवळे म्हणजे शुध्दता असते. ही शुध्दता अलिप्ततेकडे नेणा-या मंडळीसाठी हा लेख महत्वाचा आहे.

कोरोनाच्या महामारीत सोवळे कसे योग्य आहे असे सांगत सोवळ्याचे समर्थन करणारी मंडळी आपल्या महात्म्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. परत एकदा आपल्या कर्मठपणाचे समर्थन प्राचिन परंपरेला महान ठरवत सोवळे ओवळे याचे समर्थन करताना अनेकजण दिसत आहेत. सोवळ्यातील लोक त्यांच्या कर्मठपणसाठी प्रसिध्द होती. सोवळ्यातला व्यक्ती पूर्वी आदरास पात्र होता. बदलत्या स्थितीत तोच आता टिंगल अथवा उपहासाचा धनी झाला आहे. ही मानसिकता होण्यास कोण कारणीभूत आहे, हे एकदा तटस्थपणे तपासले पाहिजे. माणूस माणसाने कसा विटाळू शकतो? माणसाच्या स्पर्शाने विटाळलेला माणुस जनावराच्या मुत्राने पवीत्र होतो. हे अतार्कीक आणि न पटणारे देखील आहे.
एक गोष्ट निर्विवादपणे मान्य आहे की सोवळे म्हणजे स्वच्छता. सोवळे म्हणजे शुचिर्भुतता पण मन, विचार आणि शरीर शुध्द नसेल तर ते सोवळे काय कामाचे? ओवळयाला सोवळे करील ते खरे सोवळे. ओवळयाचा स्पर्श झाला म्हणजे जे सोवळेपण नष्ट होते, ते सोवळेपण किती कमकुवत असले पाहिजे! दोन शक्तींच्या संघर्षात जी शक्ती दुसर्‍या शक्तीचे रूपांतर करील, तीच शक्ती अधिक प्रभावी होय. सोवळे प्रभावी करायचे असेल ओवळेपण नष्ट करण्याची शक्ती त्यात द्यावी लागेल.
अनेकांना आपल्या उपाधींचा अहंकार असतो. ही उपाधी म्हणजे ओवळे आणि उपाधीरहीत होणे म्हणजे सोवळे. उपाधींचा त्याग करून देवाच्या उपवासात जायचे असते. आणि नेमके इथेच चुकले असे वाटते. ज्ञान किंवा गुरूकृपेने किंवा परंपरेने मिळालेल्या उपाधीसह सोवळे केले गेले आणि घोटाळा झाला. देवाच्या सहवासात गेले की उच्च-निच्च असा भेद राहत नाही. तिथे सगळे सारखे कारण उपाधी गळून पडलेली असते.
सोवळ्याच्या विषयाला अधिक स्पष्ट करण्याआधी मी माझ्या आज्जीचे उदाहरण देतो. माझे कांही मित्र आहेत. त्यांची नावे देखील मी य़ेथे उघडपणे घेईन त्यांना देखील ते आवडेल. माझी दोन मित्र म्हणजे गोविंद आणि सिध्दार्थ आणि माझ्या घरात नित्य वावरणारे. आणखी एक व्यक्तीमत्व आहे. आम्ही त्यांना मुरलीमामा या नावाने ओळखतो. गोविंद एक संघ स्वयंसेवक आणि सिध्दार्थ एक पत्रकार प्राध्यापक. तर मुरलीमामा मंडप उभारणीचे काम करतात. या तिघांचा माझ्या घरातील वावर मुक्त आहे. मुख्य म्हणजे माझ्या कर्मठ आजीला देखील या वावरावर कोणताच आक्षेप नव्हता की त्यांच्या जातीची अडचण नव्हती. पण माझी आजी सोवळे ओवळे करायची.
या तिघांच्या बाबतीत मात्र ती जरा वेगळे मत ठेऊन होती. मी विचारलं देखील, ‘तुला असं कस चालत’ मग ती म्हणाली, ती लेकरं चांगली आहेत रे. तिच्या मनातच जे चांगलं ते तिच्या सोवळ्याला कसली बाधा आणत नव्हतं आणि तिच्या मनात जे वाईट ते तिच्या सोवळ्यात बाधा आणणारे होते. मी पारशा अंगाने (अंघोळ न करता) स्वयंपाक घरात जाणे तिला कधीच आवडले नाही. तिचा विटाळ व्हायचा लगेच.
माझ्या आज्जीच्या या वर्तनाने मन चांगले असेल तर सोवळे आडवे येत नाही हे मला समजत होतं.
खरतर सोवळं ही संकल्पनाच स्वच्छतेशी निगडीत आहे. पण तिला अलिप्ततेचे स्वरूप दिले गेले. ते केवळ आपलं वेगळेपण जपण्यासाठी. मी सोवळ्यात असतो म्हणजे ईतरांपेक्षा वेगळा आहे हे दाखविण्यासाठी. देह शुध्द असावा, मनाची शुचिता जोपासली जावी. आरोग्य स्वच्छतेशी निगडीत आहे. त्यामुळे स्वच्छ असणे केंव्हाही उत्तम. देवाची पुजा सोवळ्यात करावी म्हणजे मन शुध्द करून करावी. स्वच्छ वस्त्र नेसून करावी.
अलिप्तता असलीच तर ती माणसांची नव्हे तर अमंगल विचारांची असावी, हेच सोवळ्यात अपेक्षीत आहे. मनातील दुष्ट विचार झटकून टाकावे. मत्सर लोभ या भावना दूर कराव्यात आणि मग देवाच्या सानिध्यात जावे सोवळ्यात हीच संकल्पना होती. पण त्यात दुर्दैवाने वस्त्र म्हणजे सोवळे आले. असे वस्त्र जे कितीतरी दिवस धुतले जात नाही. त्या वस्त्राला सोवळे म्हणत अंगावर परिधान केले की देवाला स्पर्श करण्याचा परवाना मिळाला आणि ज्यानी हे वस्त्र घातले नाही त्यांना देवाला हात लावायची परवानगी नाही. हे नवे सुत्र आणले गेले. खरतर त्याग आणि वैराग्यचा प्रतिक असलेला भगवा कपडा अंगावर आला की मोह, मत्सर याचा त्याग करून शुध्द अंतःकरणाने देवासमोर जायचे असते. त्यासाठीच पुजेच्या वस्त्राचा रंग तसा आला. पण भगवे घालून मत्सर सोडण्यापेक्षा विशिष्ट ज्ञाती अथवा धर्म यांच्याविषयी मनात येणारी हिणतेची भावना सोवळ्यात कशी येईल तेच समजत नाही. चुकलय कोठेतरी... हे जिथे चुकलय तेथून दुरूस्त करणे आवश्यक आहे. बाबासाहेब जे सांगत होते तेच तुकोबारायांनी साडेतिनशे वर्षापूर्वी सांगितले. तेच सत्य ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून मांडले. आणि ज्ञानेश्वरी ज्या गीतेवर आधारलेली आहे त्या गीतेत हे हजारो वर्षापूर्वी सांगितले गेले आहे. तरीही हे असे का घडत आले ते तपासले पाहिजे.
न धर्मस्यापदेशेन पापं कृत्वा व्रतं चरेत् ।
व्रतेन पापं प्रच्छाद्य कुर्वन्स्त्रीशूद्रदम्भनम् । । ४.१९८[१९९ं] । ।

पाप करून त्याच्या प्रायश्चित्तासाठी व्रताचरण करीत असता मूळ हेतू लपवून ठेवून खरा धर्मच आपण आचरत आहोत असे भासवत लोकांची फसवणुक करू नये असे मनू सांगतो. नेमका याचाच विसर अनेकांना पडतो.
आता कांही उदाहरणे देत आहे. जो वर्ग मनुस्मृतीचा समर्थक आहे. आणि त्याच्या आधारावर जो सोवळे ओवळे पाळतो त्यांनी तर नक्की वाचावे आणि जे मनुस्मृतीला दोष देतात त्यांनी देखील नक्की वाचावे. हे वाचल्यावर सोवळे कोणते सांगितले आहे. आणि त्याचा वापर कसा झाला हे आपल्या लक्षात येईल. ही केवळ उदाहरण म्हणून कांही श्लोक देत आहे.
मनुस्मृती सोवळे कसे सांगते ते बघा
परकीयनिपानेषु न स्नायाद्धि कदा चन ।
निपानकर्तुः स्नात्वा तु दुष्कृतांशेन लिप्यते । । ४.२०१[२०२ं] । ।

ज्यातील पाणी प्यायले जाते, अशा धर्मार्थ बांधलेल्या जलाशयात कधीही स्नान करू नये. याने पातक लागते. इथे पापाची भिती ही पाणी दुषीत होऊ नये यासाठी आहे. स्नानासाठी कोणते ठिकाण वापरावे हे देखील मनू स्पष्ट करतो.
नदीषु देवखातेषु तडागेषु सरःसु च ।
स्नानं समाचरेन्नित्यं गर्तप्रस्रवणेषु च । । ४.२०३[२०४ं] । ।

नदी, झरे- प्रवाह अथवा नदीचा डोह याचा स्नानासाठी वापर करावा. येथील पाणी प्रवाही असते. स्नानामुळे दुषीत झालेले पाणी प्रवाहासोबत वाहत जात असते. मनूने आहारासंबंधी देखील सोवळे सांगितले आहे.
मत्तक्रुद्धातुराणां च न भुञ्जीत कदा चन ।
केशकीटावपन्नं च पदा स्पृष्टं च कामतः । । ४.२०७[२०८ं] । ।
उन्मत्त, संतापी आणि रोगी यांचे अन्न केव्हाही खाऊ नये. ज्या अन्नात केस, किडे अथवा ज्या अन्नाला जाणीवपूर्वक पायाचा स्पर्श झाला आहे असे अन्न खाऊ नये
अनर्चितं वृथामांसं अवीरायाश्च योषितः ।
द्विषदन्नं नगर्यन्नं पतितान्नं अवक्षुतम् । । ४.२१३[२१४ं] । ।

सत्कार न करता दिलेले, यज्ञादी धर्मकृत्यावाचून स्वादासाठी तयार केलेले मांसान्न शत्रुचे अन्न पापी माणसांचे अन्न ज्याच्यावर कोणी शिकंले आहे असे अन्न वर्ज्य करावे.
हे वर्ज्य करणे हे सामाजिक हितासाठी आहे. पण
मनुस्मृतित पाचव्या अध्यायात ज्ञान, तप, अग्नि, आहार, मृत्तिका, मन, जल, सारवण, वायु, कर्म, सूर्य व काल या गोष्टी प्रत्येक प्राण्यांच्या शुध्दिची साधने सांगीतली आहेत.
धान्य हे सूर्यप्रकाशाने शुध्द होते (आजही आपण उन्हाऴ्यात धान्याला उन लावुन ठेवतो त्यामुऴे कीड लागत नाही).
घामाने मलीन झालेली गात्रे पाण्याने शुध्द होतात (हातपाय धुतले स्नान केले कि "फ्रेश "वाटते, त्यालाच शुध्दि म्हटले आहे).
सोने, रुपे ही अग्नि व पाण्याने शुध्द होतात (सोनार दागिने बनवताना अाधी आगीत घालतो, मग पाण्याचा वापर करतो म्हणजे धातु शुध्द होतो)
तांब्ये, कासे वगैरे धातु पात्र क्षार व आंबट पदार्थाने होते (आमसुल किंवा लिंबु-चिंच) अनेक साबण कंपन्याही लिंबाची शक्ती म्हणुन जाहिरात करतात.
सत्य भाषणाने मन शुध्द होते.
ब्रह्मज्ञान हे बुध्दि शुध्द करते.
माता भगिनी या प्रत्येक महिन्यास रजस्वला झाल्यानंतर आपसुक शुध्द होतात
अशी शुध्दता सांगितलेली असताना आपण मात्र भलतीच शुध्दता पाळत असतो.सोवळ्याचा भलताच अर्थ काढत स्वतःला विशिष्ट समजत समाजापासून वेगळं आणि वरच्या स्थानावर ठेवण्याची कृती ब्राह्मण वर्गाकडून झाली. आणि दोष मनूच्या माथी बसला.
सोवळे काय हे समजून घेताना त्याची त्याकाळात असलेली अपेक्षीत मांडणी करावी लागेल. आणि मुख्य म्हणजे सोवळ्याच्या नावाखाली ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांची क्षमा मागावी लागेल. अशी माफी अन्याय करणा-या सगळ्यांनीच माणली पाहिजे असा माझा आग्रह आहे. पण तरीदेखील मी माझ्यापुरती तरी माझ्या ज्ञाती बांधवांनी केलेली कृती ज्यांच्यावर अन्याय करणारी होती त्यांची सगळ्यांची मी क्षमा मागत आहे.
जन्मता विटाळ मरताची विटाळ
मध्यंतरी सोवळे कैसे बप्
पा
हा तुकाराम महाराज यांचा अभंग खूप कांही सांगून जातो. जन्म आणि मरण यातील विटाळ हा तर निव्वळ थोतांड आहे. होय मी सोवळ्यात असतो, कारण मी मन शुध्द ठेवतो. मी कोणत्याच व्यक्ती ज्ञाती अथवा धर्माविषयी हीनतेची भावना ठेवत नाही. मी अलीप्त असेलच तर व्यक्तीपासून नव्हे तर मत्सर आणि लोभ यापासून आहे. हे सोवळे मी पाळत राहिन.