सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात पाच कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

1 min read

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात पाच कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

सोयबीनचे बोगस बियाणे द्यलाबद्दल बीड मध्ये तीन तर हिंगोली मध्ये दोन कंपन्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

बीड : सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मधील दोन कंपन्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यात एकट्या बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगानं ग्रीन गोल्ड कंपनीवर परळीमध्ये तर जानकी व यशोधा या कंपन्यांवर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इंगल सीड्स प्राइवेट लिमिटेड इंदौर व अंकुश सीड्स प्राइवेट लिमिटेड नागपूर या दोन कंपन्या विरोधात हिंगोली मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगान परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स या औरंगाबादच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर हिंगोली सेनगाव चे कृषी अधिकारी संदिप वयकुंटे यांनी इंगत सीड्स प्राइवेट लिमिटेड इंदौर आणि अंकुश सीड्स प्राइवेट लिमिटेड नागपूर यांच्या विरोधात सेनगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याच प्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जानकी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड व हिंगणघाट जिल्हा वर्धा इथल्या यशोधा हायब्रीड सीड्स या कंपन्यावर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

यावर्षी पहिल्यांदाच मागच्या काही वर्षांमध्ये जून महिन्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली त्यामुळे पेरणीने जोर धरला होता. सुरवातीच्या काळामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर ते उगवत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. मागच्या तीन आठवड्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत.

कृषी विभागाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये न उगवलेल्या सोयाबीनचा पंचनामा करण्यासाठी समिती स्थापन केल्या होत्या. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून पाच सोयाबीन बियाणे कंपनीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

गुन्हे दाखल मात्र शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार

पेरलेल्या सोयाबीन उगवले नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाहणी दौरा सुद्धा काढला होता. त्यानंतर पंचनाम्याला सुरुवात झाली खरी मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर बोगस सोयाबीन बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली खरी मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी हा प्रश्न मात्र आणखीही अनुत्तरीतच आहे.