प्रभारीराज मुळे हिंगोली जिल्ह्यातील  क्रीडा विकास खुंटला.

1 min read

प्रभारीराज मुळे हिंगोली जिल्ह्यातील क्रीडा विकास खुंटला.

हिंगोलीचा क्रीडा विभाग ठरतोय पांढरा हत्ती.

हिंगोली- मराठवाड्यातील अविकसित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून तालुका क्रीडा अधिकारी दर्जाच्या व्यक्तीकडे प्रभारी म्हणून सोपविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा विकासाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
शहरालगत जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून प्रशासनाने हिंगोली शहरापासून तब्बल आठ किलोमीटर लांब अंतरावर जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती केली. क्रीडा संकुल अतिशय दूर होत असल्यामुळे शहरातील खेळाडूंना नाईलाजाने सशुल्क खाजगी मैदानांचा वापर करावा लागत आहे. आजही जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव तसेच वसमत येथे क्रीडा सुविधा उपलब्ध नाहीत. दीड ते दोन वर्षापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी पवार यांची बदली झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याचे क्रीडा अधिकारी कलिमुद्दिन फारुकी यांची हिंगोली प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आधीच संथ गतीने चालणाऱ्या या विभागाचा कारभार कलिमुद्दिन यांच्या बदलीनंतर जवळपास ठप्प झाला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा कारभार देखील ढेपाळला असून शहराबाहेर असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने कार्यालयात हजेरी लावतात. अनेक कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील दिवस वाटून घेतले असून बहुतांश वेळी कार्यालय बेवारस स्थिती मध्ये आढळून येते. जिल्ह्यातील विविध खेळाडू व क्रीडा शिक्षक यांना त्यांच्या कामानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अनेक चकरा माराव्या लागतात. त्यातच कार्यालय शहरापासून दूर असल्यामुळे खेळाडूंची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने दखल घेऊन बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करीत हिंगोली जिल्ह्या करिता कायमस्वरूपी जिल्हा क्रीडा अधिकारी नेमावा अशी मागणी क्रीडाप्रेमी मधून होऊ लागली आहे.